प्रतापगड कारखाना सहयोगी तत्त्वावर चालवून आगामी गाळप हंगाम यशस्वी करणार: सौरभ शिंदे : १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करणार असल्याची ग्वाही

कुडाळ ता. 4 – जावली तालुक्याचा मानबिंदू असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आगामी सन २०२६-२७ चा गाळप हंगाम सहयोगी तत्त्वावर चालवून यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे. तसेच, हंगाम सन २०२५-२६ मधील गाळप झालेल्या ऊसाची बिले १५ जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जातील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष श्री. सौरभबाबा शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतापगड सहकारी कारखाना गेली तीन वर्षे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत होता. मात्र, आगामी सन २०२६-२७ च्या हंगामापासून अजिंक्यतारा साखर कारखाना हा सदरचा करार सामंज्यसाने संपुष्टात आणणार असल्याने प्रतापगड कारखाना मूळ व्यवस्थापनाच्या ताब्यात देत आहे. त्यामुळे आगामी हंगाम यशस्वीरीत्या सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने जाहिरातीद्वारे निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार, मे. गुडगुंटी शुगर्स अँड बायोएनर्जीज प्रा. लि., जमखंडी यांनी कारखान्याकडे आपली निविदा सादर केलेली आहे. शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून या एजन्सीसोबत संचालक मंडळाची सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे.

कारखाना नवीन एजन्सीला चालविण्यास देण्यापूर्वी, मागील हंगामातील (२०२५-२६) शेतकऱ्यांची देय असलेली ऊस बिले १५ जूनपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संचालक मंडळ सकारात्मक पावले उचलत असून “शेतकरी बांधवांनी ऊस बिलाबाबत पूर्णपणे निश्चिंत राहावे आणि कारखान्याच्या हितासाठी नेहमीप्रमाणे कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करावे.” असे आवाहनही यानिमित्ताने अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले आहे. यावेळी प्रतापगड कारखाना कार्यस्थळावर आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीस माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे, अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्यासह गुडगुंटी शुगर्सचे संचालक विरूपकश्य गुडगंटी, युनिट प्रमुख महालिंग हिरेमठ, कार्यकारी संचालक रविंद्र देसाई यांच्यासह प्रतापगडचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्या हस्ते गुडगुंटी शुगर्सचे संचालक विरूपकश्य गुडगंटी व उपस्थितांचा सत्कारही करण्यात आला.





