कुडाळ ता. 4 : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘प्रो रोल बॉल लीग’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जावळी तालुक्यातील कुडाळ येथील रहिवाशी सध्या राहणार निगडी (पुणे) येथील शुभम शेवते या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात लिलाव प्रक्रियेद्वारे पुणे टायगर संघाकडून त्याची निवड करण्यात आली आहे. शुभम गेल्या दहा वर्षांपासून रोल बॉल या खेळाचा सराव करीत आहे. आतापर्यंत शुभमने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोल बॉलच्या अनेक स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. पहिल्याच लीग स्पर्धेमध्ये पुणे टायगर संघात स्थान मिळाल्यामुळे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्याला मिळाली आहे.
काय आहे प्रो रोल बॉल लीग –
‘आयपीएल प्रमाणेच प्रो रोल बॉल लीग ही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी ही पहिलीच लीग स्पर्धा आहे. २० नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे व गोवा येथे होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. पुणे, मुंबई, गोवा, इंदूर, बंगळूर, दिल्ली, कोलकता, केरळ या शहरांतील संघांचा यामध्ये समावेश आहे. एका संघामध्ये १० खेळाडूंचा सहभाग असून, या सर्व खेळाडूंची निवड लिलावाद्वारे करण्यात आली आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. एका संघात तीन विदेशी खेळाडूंना स्थान देण्यात आलेले आहे. रोल बॉल हा खेळ जरी भारतीय असला तरी तो महाराष्ट्रामध्ये फारसा खेळला जात नाही. बाहेरच्या राज्यांमध्ये मात्र अनेक खेळाडू या खेळाकडे वळत आहेत. परिणामी हा खेळ इतर राज्यात अधिक लोकप्रिय आहे. इतर राज्यांतील रोल बॉल खेळणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सरकारी नोकरी, शिक्षणामध्ये विशेष सवलती मिळतात. प्रो रोल बॉल लीगमुळे हा खेळ दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोचणार आहे. त्यामुळे भविष्यात शुभम सारख्या खेळाडूंना अशा स्पर्धांचा फायदा होणार आहे. शुभमने आतापर्यंत रोल बॉल एशियन चॅम्पियनशिप, थायलंड, २०१६, रोल बॉल वर्ल्ड कप, बांगलादेश २०१७, रोल बॉल वर्ल्ड कप चेन्नई, २०१९ आदी स्पर्धा खेळलेल्या आहेत.
कोट – शुभम शेवते, रोल बॉल खेळाडू
प्रो रोल बॉल लीगमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करायला मिळणार असल्याचा मला आनंद आहे. या स्पर्धेबरोबरच रोल बॉलचा समावेश आता ऑलिंपिक स्पर्धेतही झालेला आहे. जे समाधानकारक चित्र आहे.या लीग मॅचेसला नक्कीच क्रीडाप्रेमी प्रतिसाद देतील असा विश्वास आहे.