कुडाळ -प्रतिनिधी ता. 24 – जून महिना संपत आला तरी मान्सून सक्रिय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात होती. अशात सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर तालुक्यात मान्सूनने हजेरी लावली. जावली तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर भागात पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण
झाला होता.
शनिवारी सकाळपासून आभाळात ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अशात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जावळी तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तालुक्याच्या सर्वच परिसरात हलक्या,मध्यम सरी बरसल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहे. पेरण्या करण्यासाठी अजून पावसाची खूप आवश्यकता आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांनी मुबलक पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे. पेरण्यांना प्रारंभ करण्यासाठी जावळी तालुक्यात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. दरम्यानआज शनिवारी सकाळपासूनच तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून पावसाळापूर्व कामे केली जात आहेत. आजच्या पहिल्याच पावसाचा महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी,बालचमू, नागरिकांनीही आनंद लुटला.