जावळीराजकीय

जावली बाजार समितीसाठी १२१ विक्रमी अर्ज दाखल -वर्चस्वासाठी तीन आमदार रिंगणात – बिनविरोधच्या चर्चेला कार्यकर्त्यांकडून सुरूंग

कुडाळ ता. 4 – जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीसाच्या निवडणुकीने तालुक्यातीलराजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तब्बल १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब रुपनवर व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी दिली. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सूरू असतानाच विक्रमी अर्ज दाखल झाल्याने निवडणुक अटळ असल्याचे बोलले जात असून यामुळे सर्वच पक्षांच्या नेतेमंडळीची डोकेदुखी वाढली आहे.


अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी व त्यांच्या उमेदवारांनी कार्यालयात एकच गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, महाबळेश्वर चे माजी सभापती संजय गायकवाड, उपसभापती सौरभ शिंदे, माजी शिक्षण सभापती अमित कदम, संदीप पवार, एकनाथ ओंबळे, मालोजीराव शिंदे, जयदीप शिंदे, बाबुराव संकपाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती हनमंतराव पार्टे आदी नेते कार्यालयाच्या आवारात सकाळ पासून तळ ठोकून होते. महाविकास आघाडी, आमदार शिवेंद्रसिंहराजे व आमदार मकरंद पाटील गट, बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना, दीपक पवार गट असे सर्व गटातटाकडून वेगवेगळे अर्ज दाखल झाले आहेत,

सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण मतदारसंघातील ७ जागांसाठी ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत महिला गटात २ जागेसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गात १ जागेसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती गटात १ जागेसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटात २जागेसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती गटात १ जागेसाठी ८ उमेदवारअर्ज दाखल झाले आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटात १ जागेसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल झालेआहेत. अडते व व्यापारी मतदारसंघात २ जागांसाठी ८ उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत. हमालव मापाडी मतदारसंघात १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण १५४ उमेदवारीअर्जाची विक्री झाली होती त्यापैकी १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले
या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघात ८८४ मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात १३३०मतदार आहेत. अडते व व्यापारी मतदारसंघात ३०८ मतदार आहेत. हमाल व मापाडी मतदारसंघात केवळ ८ मतदार आहेत. २० एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणूक बिनविरोध होणार का ? निवडणूक लागणार हे स्पष्ट होणार आहे

आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी तीन आमदार रिंगणात

बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी आता जावली तालुक्यातील नेत्यांकडून प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर जावलीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व अबाधित आहे, मात्र गेल्या पाच वर्षात तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत व तालुक्याचे नेतृत्व भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे असल्याने यावेळच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, सध्या ही बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने सत्तांतर करून ती भाजपाच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकत्यांकडून होऊ शकतो, तसेच जिल्हा बँकेतील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आमदार शिंदे यांच्या फारच जिव्हारी लागल्याने, त्याचा परिणामही येऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे, महाबळेश्वर तालुक्याचे नेतृत्व आमदार मकरंद पाटील यांच्याकडे आहे, जावली बाजार समिती ही महाबळेश्वरशी संलग्न असल्याने आमदार मकरंद पाटील यांची भुमिकाही या निवडणुकीत निर्णायक राहणार आहे, एकुणच आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील हे तीनही आमदार आपल्याच कार्यकत्यांची वर्णी लागावी यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button