सातारा- जावळी तालुक्याने सातत्याने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. तालुक्यासाठी महत्वाचा असलेला बोंडारवाडी धरण प्रकल्प करत असताना बोंडारवाडीमधील स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या सोडवून हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. बोंडारवाडी धरण प्रकल्प समन्वयाने मार्गी लावणारच, त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे स्पष्ट करून तालुक्यातील सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद असून जनतेच्या पाठबळावर मी कोणत्याही आव्हानांना सामोरे जायला तयार आहे, असा इशाराही आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
अतिवृष्टीत वाहून गेलेल्या नांदगणे-पुनवडी पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी व केळघर विभागातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, एकनाथ ओंबळे, राजाराम ओंबळे, हरिभाऊ शेलार, भाऊसाहेब उभे, सखाराम सुर्वे, बबन बेलोशे, सुनील जांभळे, सागर धनावडे, अंकुश बेलोशे, सुरेश पार्टे, कोमल आंग्रे, अमोल आंग्रे, जगन्नाथ दळवी, अर्जुन जाधव, जगन्नाथ वाडकर, जगन्नाथ जाधव, विलास शिर्के, रमेश वाडकर, बबन शिंदे, नाना जांभळे आदींची उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, काही जणांनी मुद्दामहून अफवा उठवली होती की माझा बोंडारवाडी धरणाला विरोध आहे. मात्र सुरुवातीपासून मी कधीही या धरणाला विरोध केला नाही. या धरणासाठी प्रयत्न करणाऱ्या कै. विजयराव मोकाशी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या धरणाचे काम पूर्ण करणार आहे. स्थानिक ग्रामस्थांना पुनर्वसनाचे पूर्ण लाभ राज्य सरकारकडून मिळवून देणार आहे.
मे महिन्याअखेर पुनवडी पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभाग व ठेकेदाराला दिल्या आहेत. वरोशी-वाहिटे रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. केळघर-कुरळोशी-गाढवली रस्त्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे. आंबेघर ते बोंडारवाडी या रस्त्याचे काम ही पूर्ण होणार आहे. धरणाच्या सर्वेक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ८० ते ९० लाख रुपये निधी उपलब्ध होणार आहे. विधानसभेच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मी या प्रकल्पसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुसार शेतीसह व पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी क्षमतेच्या धरणास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. ज्याप्रमाणे सातारा तालुक्यात उरमोडी धरणाचे काम पूर्ण झाल्यावरही दूरदृष्टीने कै. भाऊसाहेब महाराजांनी प्रत्येक गावात बंधारे बांधले होते. धरणातील पाणीसाठा कमी झाला तर बंधाऱ्यात उपलब्ध असणारे पाणी उपयोगी येईल म्हणून जावळी तालुक्यात देखील बंधारे बांधणार आहे. बाजार समितीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बाजार समितीची निवडणूक परवडण्यासारखी नाही. याबाबत आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून संस्थेवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सामोपचाराने तोडगा काढू मात्र कुणाला ही निवडणूक लढवायची असेल तर मात्र मी मागे हटणार नाही. संस्था टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तालुक्यातील काही जणांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत मात्र जावळी तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी सातत्याने उभी आहे त्यामुळे कोणत्याही आव्हानाला सामोरे जायची माझी तयारी आहे, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक रांजणे म्हणाले, जावळी तालुक्यातील प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्वप्रकारची विकासकामे केली आहेत, त्यामुळे केळघर विभाग आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहील. विकासकामे करणाऱ्या बाबाराजे यांचे योगदान कधीही विसरू नये. रामभाऊ शेलार यांनी सूत्रसंचालन केले. संजय दळवी यांनीप्रास्ताविक केले. ज्ञानदेव रांजणे यांनी आभार मानले. यावेळी परिसरसतील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, युवक उपस्थित होते.