कुडाळ दि 21 : जावळी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अचानक कधीही पाऊस येत असून शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. याचा सध्या शेतात असणाऱ्या भुईमूग, सोयाबीन या पिकांना फटका बसत असून हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली मात्र नंतर चांगला पाऊस झाल्याने खरिपाची पिकेही जोमात आली.मात्र ऐन पिके काढणीला आल्यावर परतीच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे सध्या शेतातील भुईमूग, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.पावसाची उघडीप मिळताच शेतकऱ्यांची पीके काढणीची लगबग सुरू आहे .मात्र अचानक येणाऱ्या या पावसाने त्यांची चांगलीच धांदल होत आहे. परतीचा पाऊस भागात सगळीकडे जोरदार कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
सोयाबीन,भुईमूग पिके काढणीला आली आहेत.अशातच पावसाने जोर धरल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. भुईमूगाच्या शेंगा उगवायला सुरुवात झाली अजून काही दिवस पावसाचा जोर असाच रहिल्यास पिके शेतातच कुजण्याची शक्यता आहे.निसर्गाच्या या लहरीपणाचा मोठा फटका सहन करत आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असल्याने शेतीला मोठा फटका बसत आहे.चवळी, मूग,वाटाणा ही कडधान्य तसेच धना,घेवड्याचे पीक पावसाने धोक्यात आली
यामुळे उत्पादनात घट होणार आहे.निसर्गाच्या लहरीपणीचा नेहमीच बळी ठरणारा शेतकरी पुन्हा एकदा आस्मानी संकटाचा सामना करत आहे. परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने बळीराजाची अवस्था बिकट झाली आहे. सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरते हवालदिल असून आभाळाकडे नजरा लावत पाऊस थांबण्यासाठी वरुणराजाला साकडे घालू लागले आहेत.