
कुडाळ ता. 24 – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजच्या पिढीला समजावे व त्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव व्हावी, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यावर्षीही कुडाळ ता.जावळी येथे 28 फेब्रुवारी ते 29 मार्च या दरम्यान बलिदान मास आचरण्यात येत आहे. गेल्या पंचवीस दिवसांपासून रोज सायंकाळी 7 वाजता कुडाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील नटराज चैाकात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी तसेच शेकडो बालचमू व युवक व युवती यांच्या उपस्थितीत छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मंत्रोच्चाराने स्मरण केले जात आहे.

शिवप्रतिष्ठानतर्फे कुडाळ सह परिसरात बलिदान मास पाळण्याबाबत गावोगावी जागृती करण्यात आली होती. त्यानुसार नित्याने हा उपक्रम सूरू आहे. औरंगजेबाने धर्मांतरासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ
केला व शंभूराजांची निर्घृण हत्या केली. या बलिदानाचे हिंदू धर्मियांना स्मरण व्हावे, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने धर्मवीर बलिदान मास आचरला जातो.

संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभूराजांना श्रद्धांजली वाहिली जाते. तरुण मंडळी आपल्याला आवडती एखादी वस्तू अथवा पदार्थ वर्ज्य करून धर्मवीर बलिदान मास पाळतात.या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळला जातो. त्यानुसार बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी मूक पदयात्रा काढली जाणार आहे. अधिकाधिक तरुणांनी या पदयात्रेत सहभाग घेऊन शंभूराजांच्या धर्मभक्तीला अभिवादन करावे, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.
