
कुडाळ ता. 7 – प्रतिपंढरपूर करहर ता. जावळी येथील आषाढी यात्रा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सूरू केल्या आहेत. यात्रेशी संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ही कामे प्राधान्याने मुदतीत पूर्ण करावीत, प्रतिपंढरीचा आषाढी एकादशी सोहळ्याचे महात्म्य दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले असल्याने यावर्षी मोठ्या संख्येने भाविक प्रती पंढरपूर करहर मध्ये विठ्ठल दर्शनास येणार आहेत. त्या पार्श्भूमीवर उत्सव समितीसह प्रशासनाने, तसेच प्रत्येक विभागाने योग्य त्या दक्षता घेवून उत्सव सोहळा चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल या दृष्टीने व्यवस्था ठेवावी. भाविक व ग्रामस्थांनी दरवर्षी प्रमाणे प्रशासनास सहकार्य करून यात्रा सोहळा अधिकाधिक दिमाखदार व सुरूळीत पार पाडावा असे आवाहन सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना केले.

प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी यात्रा नियोजनाबाबत आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी, तहसीलदार हणमंत कोळेकर, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, प्रमोद शिंदे, समाधान पोफळे, नितीन गावडे, अरुण यादव, संदिप परामणे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भोसले, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पाणीपुरवठा अधिकारी , जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी श्री. पवार, उपविभागीय अभियंता यांच्यासह पदाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व उत्सव समिती व सांप्रदायिक मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाविकांना रांगेतून दर्शऩ घेताना मंडपाची उभारणी करावी तसेच दिंडी सोहळ्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने सामाजिक संदेशपर चित्ररथ काढून मिरवणुक काढावी अशा सुचना दिल्या,

भाविकांसाठी आरोग्यसेवा, स्वच्छता याबाबत सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पावसामुळे चिखल होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांवर मुरूम टाकणे आदी निर्णय घेण्यात आले. करहर येथे येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले. बैठकीमध्ये ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, आदी विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. नितिन गावडे यांनी उपस्थिांचे स्वागत केले. तर यात्रा समीतीच्या वतीने आभार मानन्यात आले. बैठकीनंतर मान्यवरांनी मंदिर तसेच सभामंडप, दर्शन रांग परिसराची पाहणीही केली.

यावर्षी आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्सवात होणार असल्याने विठ्ठल भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. पंढरपूरला जावू न शकणाऱ्या भक्तांना प्रती पंढरपूर करहर येथेच दर्शन होणार आहे. या सोहळ्यासाठी करहर बाजारपेठेसह तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षी संदिप मोहिते सांगली यांचे भारुडाचा कार्यक्रम 12 ते3 या वेळेत होणार असून सोबत लिंब योथील सुश्राव्य भजन कार्यक्रम होणार आहे.
