
कुडाळ ता. 7 – महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा भाजपाचा कणा असल्याने पदाधिकाऱ्यांसह तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांला आगामी काळात ताकद दिली जाईल, तसेच सातारा जावली मतदार संघाच्या विकासासाठी सुध्दा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केले.

कुडाळ ता. जावली येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी श्री भोसले बोलत होते, यावेळी कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते,यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते,

पुढे बोलताना नामदार भोसले म्हणाले, तालुक्यात पाचवड ते खेड दरम्यान होत असणारा महामार्ग तसेच कुडाळ ते पाचगणी या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या माध्यमातून परिसरातील विकास कामांना चालना मिळणार आहे. त्याचबरोबर प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टीपथात आल्या असून आगामी निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी अशीच एकजूट कायम ठेवून भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच संदीप परामणे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्ष बांधणीसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही नमूद केले. यावेळी नामदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते तालुका कार्यकारणी निवड झालेल्या अनेक सदस्यांना नियुक्ती पत्र देऊनसन्मानित करण्यात आले. तालुकाध्यक्ष संदिप परामणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.




