
कुडाळ ता. 19 – स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळा कुडाळ च्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य स्पर्धेत जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शाळेचा डंका सातारा जिल्ह्यात वाजवला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेतील या चिमुकल्यांचे कौतुक करत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. स्पर्धेत जिल्हायत प्रथम क्रमांक मिळविल्याने यातील सहभागी विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांच्यावर पंचक्रोशीसह तालुक्यातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा करिता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सातारा येथे या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय लोकनृत्य मोठा गट स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळा कुडाळच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व मोठा गट स्पर्धेत राजवीर सागर शिंदे – प्रथम क्रमांक, जिल्हास्तरीय निबंध लहान गट स्पर्धेत नेहा सुधीर मोहिते हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका आदिंनी सहकार्य केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, कुडाळच्या सरपंच सुरेखा कुंभार, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षणविस्तार अधिकारी अरविंद दळवी, चंद्रकांत कर्णे, शंकर बिरामणे, मुख्याध्यापिका सौ. जयश्री गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कुडाळ, यांनी अभिनंदन केले.
