
कुडाळ ता. 17 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानिक संरचनेमुळे देशात सामाजिक आणिराजकीय लोकशाहीचा पाया रचला गेला, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित झाला आहे. देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज समाजातील सामान्य व्यक्तीलाही सभापती, सरपंच आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यांनी संविधानात सर्वांना समान हक्क दिल्यानेच मलाही पंचायत समिती सभापती पदापर्यंत पोहोचता आले, असे प्रांजळ मत जावली पंचायत समितीचे सभापती सैारभ शिंदे यांनी व्यक्त केले.

कुडाळ ता. जावली येथील बाजारपेठेत यावर्षी प्रथमच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, पंचशील नगर’ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १४ एप्रिल रोजी बाजारपेठेतील कुडाळ ग्रामपंचायतीच्या आवारात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह पंचशील नगरमधील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना सैारभ शिंदे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापांसून कुडाळ येथे आंबेडकर जयंती ही संपुर्ण गावाने एकत्रित मिळून बाजारपेठेत साजरी करावी अशी इच्छा होती ती आज पुर्णत्वास गेली, यापुढेही कायम बाजारपेठेतच जयंती साजरी केली जाईल असे सांगून डाँ बाबासाहेबांनी उपेक्षित घटकांना शिक्षण, आरोग्य आणि नोकऱ्यांमध्ये हक्क मिळवून दिले, जे आजच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत, डाँ.बाबासाहेबांच्या विचारांमुळेच आज देशात सभापतींसारख्या महत्त्वाच्या पदांवर सामान्यांना संधी मिळत आहे, ही खरी संविधानिक लोकशाही आहे. असेही नमूद केले.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपकरण्यात आले. त्यानंतर स्वामी मंगल कार्यालय येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. अनेक युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच पुण्यातील बुधरानी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर तसेच घोटावडेकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत अस्थिरोग तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयोजित अभिवादन सभेत भीमगीतांचा कार्यक्रमही रंगला. अनेक गायकांनी सादर केलेल्या भीमगीतांनी वातावरण भारावून गेले. प्रसिद्ध वक्ते प्रशांत यादव यांनी उपस्थितांना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे मार्गदर्शन केले. इम्तियाज मुजावर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष भीमराव कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, कार्याध्यक्ष दशरथ कांबळे सुशांत कांबळे, उमेश कांबळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






