
कुडाळ ता.5 – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच जावली महाबळेश्वर तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे व जावली राष्ट्रवादी श. प. पक्षाचे उपाध्यक्ष धनंजय पोरे, गैारव शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हेमंत शिंदे यांच्या प्रवेशामुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना जावलीतूनच मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे, तसेच यानिमित्ताने जावळीत राष्ट्रवादी (श.प.)पक्षाला मोठे खिंडार पडले असून भाजप पक्षला अधिक बळकटी येणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर प्रतापगड कारखानाचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी हेमंत शिंदे यांनी सामांजस्याची भूमिका घेत भारतीय जनता पार्टीत नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या सर्वांचे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात स्वागत केले हेमंत शिंदे यांच्या प्रवेशाने जावलीत भाजपाची ताकद वाढेल तसेच प्रवेश केलेल्या हेमंत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षामध्ये योग्य तो मानसन्मान दिला जाईल तसेच आगामी काळात पक्ष संघटनेत देखील स्थान दिले जाईल. युवा नेतृत्व सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजचा पक्षप्रवेश झाला असून सौरभ शिंदेंना देखील आगामी काळात सर्वतोपरी ताकद दिली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना दिली. कुडाळ गावचे शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.त्यामुळे या गावातील रस्ते पाणी वीज कचरा इत्यादी मूलभूत गरजा योग्य त्या पद्धतीने निर्माण होणे आवश्यक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळत आहे. येणाऱ्या काळातपाचवड ते खेड असा होणारा कोकण महामार्ग तसेच जवळच असणारे पाचगणी महाबळेश्वर इत्यादी पर्यटन स्थळे यामुळे कुडाळ गावाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे त्यासाठी कुडाळ गाव विकासाच्या दृष्टीने कुठेही मागे राहता कामा नये यासाठी सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हेमंत शिंदे यांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असेही यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले .

यावेळी बोलताना सैारभ शिंदे म्हणाले, नामदार शिंवेंद्रराजे यांच्या कार्यप्रणालीवर व भाजप पक्षाच्या कार्यपध्दतीवर प्रभावित होऊन हेमंत शिंदे यांनी आज प्रवेश केला आहे, यांच्या पक्ष प्रवेशाने विकासाला अधिक गती मिळेल त्याचबरोबर तालुक्याच्या राजकारणात त्यांची सोबत महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वासही सैारभ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षप्रवेशानंतर बोलताना हेमंत शिंदे म्हणाले, गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेऊन तसेच सौरभ शिंदे यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना पुढील राजकारणात साथ देण्यासाठी आपण नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 1999 पासून राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत निष्ठेने कार्य केले आहे. परंतु स्थानिक राजकारणाची गरज ओळखून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यावेळी कुडाळ येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




