कुडाळ ता. 28 – जावली – महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कुडाळ ता. जावली येथील मतदान केंद्रावर झालेली किरकोळ बाचाबाची वगळता इतर सर्व मतदान केंद्रांवर आज शुक्रवार ता. 28 रोजी शांततेत 84 टक्के एवढे मतदान पार पडले. 2322 मतदारांपैकी 1958 एवढ्या मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. तर उद्या ता. 29 रोजी मेढा येथील पंचायत समितीच्या बाबासाहेब आखाडकर सभागृहात मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब रूपनवर यांनी दिली.
जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 12 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते, एकुण 18 संचालकांपैकी 6 जागांवरील उमेदवारांची निवडणुकीपुर्वीच बिनविरोध निवड झाली होती, उर्वरित 12 उमेदवारांच्या निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली, गेल्या पंधरा दिवसांपासून या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते, निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने या निवडणुकीत वेगळीच रंगत निर्माण झाली होती, तीन आजी आमदार विरोधात एक माजी आमदार अशी लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळाली होती,
सुरूवातीपासून ही निवडणुक बिनविरोध करण्याचा आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील यांच्याकडून प्रयत्न झाला असतानाच माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार व शिवसेना गट यांना बिनविरोध प्रकियेमध्ये विचारात न घेतल्याने ही निवडणूक लागली असल्याचे प्रचारादरम्यान विरोधकांकडून सांगण्यात आले. जावली तालुक्यातील मेढा येथे दोन, कुडाळ येथे तीन मतदान केंद्रे देण्यात आली होती, तर महाबळेश्वर तालुक्यात तीन, तापोळा येथे दोन आणि कुंभरोशी येथे एक अशी मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडले, यावेळी सोसायटी मतदार संघासाठी 684 मतदानापैकी 642 मतदरांनी मतदान केले तर ग्रामपंचायत मतदार संघासाठी 1330 मतदानापैकी 1067 मतदारांनी मतदान केले तसेच व्यापारी अडत मतदार संघासाठी 308 मतदारांपैकी 249 मतदारांनी मतदान केले त्यामुळे एकुण 2322 मतदानापैकी 1958 मतदारांनी आपला प्रत्यक्ष मतदानाचाहक्क बजावला. मतदान प्रक्रियेसाठी 3 क्षेत्रीय अधिकारी, 55 कर्मचारी, 13 पोलीस कर्मचारी, 20 राखीव कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
कोट – संदिप पवार – शिवसेना उपजिल्हाप्रमुख
बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार हे मतदान प्रक्रियेमध्ये मतदान कक्षात आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता त्यांची असली तरी त्यांनी कोणत्या भ्रमात राहू नये त्यांनी आत जाऊन हस्तक्षेप केला तर आम्हाला त्यावर आक्षेप घ्यावे लागतील, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी दील्याने कुडाळ यथील केंद्रावर बाचाबाची झाली
कोट- जयदिप शिंदे – शेतकरी विकास पँनेल
विरोधकांच्या लक्षात आले आहे की यावेळेस आपले डिपॉझिटही जप्त होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये पोटसुळ उठला आहे. नैराश्याच्या भरात विरोधकांनी अशी वक्तव्य करत आक्षेप घेम्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे, उमेदवार कोठेही मतदाराला घेऊन जात नव्हते,असे प्रत्युत्तर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जयदीप शिंदे यांनी बाचाबाची झाल्यानंतर दिले.