कुडाळ ता.19 – जावळी तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रात हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सदगुरू 1008 महंत श्री देवीपुरी महाराज तथा धुंदीबाबा महाराज यांचा रथोत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री देवीपुरी महाराज तथा धुंदीबाबा महाराज दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दर्श अमवस्येला आपल्या जन्मगावी बेलावडे ता. जावळी येथे आपल्या भक्तगणांना दर्शन देण्यासाठी येत असत. धुंदीबाबांच्या निर्वाणानंतरही त्यांच्या रथयात्रेची परंपरा अंखडीत सूरू असून धुंदीबाबांचे शिष्य श्री योगीपुरी महाराज या रथयात्रेत सहभागी होऊन येथील भक्तगणांना आशिर्वाद देत असतात.
आजही तेवढ्याच भक्तीभावाने बेलावडे, सोनगाव व आर्डे येथील त्यांचे भक्तगण व ग्रामस्थ श्री योगीपुरी महाराजांच्या रूपात धुंदीबाबा आल्याचे समाधान मानून रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पाडतात. कुडाळ ता. जावळी येथून सूरू होत असलेली रथयात्रा गुलालाच्या उधळणीत व ढोल ताशांच्या गजरात आोम धुंदी तत सत च्या जयघोषात सोनगाव मार्गे बेलावडे येथील मेरूलिंगदरा अशी शांततेत व उत्साहात पार पडली. कुडाळ येथील महाराजा शिवाजी हायस्कूल व सोनगाव येथील धुंदीबाबा विदयालयातील विध्यार्थ्यांना महाराजांच्या हस्ते शालेय साहीत्य व खाउवाटप करण्यात आले त्यानंतर मेरूंलिंगदरा येथे रथयात्रेची सांगता ही भंडारा, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमानंतर करण्यात आली यावेळी तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.