कुडाळ दिनांक 14 (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश
उपाध्यक्षपदी सौ. समिंद्रा जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
भणंग (ता. जावळी) येथील समिंद्रा बापूराव जाधव यांचा राजकीय वारसा नसतानाही प्रथम त्यांनी भणंग ग्रामपंचायत सदस्य या पदापासून समाजकार्यास सुरुवात केली. त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून राजकारण व समाजकार्य करण्यास सुरुवात केली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाऱ्या समिंद्रा जाधव यांनी पक्षासाठी दिलेला वेळ, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेले कार्य यामुळेच त्यांची यापूर्वी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून समिंद्रा जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती.
महिला जिल्हाध्यक्षपदाच्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पक्ष तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवला, रुजवला व वाढवला. महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी स्वतःला झोकून देऊन केले. सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या यशस्विनी सामाजिक अभियान जिल्हा समन्वयक म्हणून त्यांच्यावर नुकतीच जबाबदारी दिली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल खा. सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, सत्यजित पाटणकर, अविनाश मोहिते, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, सुनील माने, राजकुमार पाटील, तेजस शिंदे यांनी सौ. जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.