कुडाळ दिनांक -7 ऊस दराच्या प्रश्नावर राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. सातारा जिल्ह्यात देखील स्वाभिमानीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सोमवार दि.7 रोजी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे – सातारा या मार्गावर आनेवाडी टोलनाका येथे रास्ता रोको करत आंदोलन छेडलं आहे.
राज्यामध्ये ऊस दराचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सातारा पुणे महामार्ग आज सकाळी दहा वाजता रोखला. आंदोलकांनी आनेवाडी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करत ऊस दराचा प्रश्न निकाली काढा अन्यथा हे आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असा इशारा दिला आहे. आज सकाळी दहा वाजता आनेवाडी टोल नाक्यावर पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक शेतकरी संघटनेने रोखली. साखर सम्राटांचा निषेध करत जोरदार निदर्शने केली. त्यामुळे आनेवाडी टोल नाक्यापासून सातारच्या दिशेने लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, काही काळानंतर वाहने पुर्ववत सोडण्यात आली.