जावळी बँकेची ४९ वी वार्षिक सभा संपन्न – मान्यवरांची उपस्थिती
महेश बारटक्के – प्रतिनिधी
कुडाळ ता.24 : कोरोना काळात अनेक व्यवसाय व उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम झाला त्याची झळ आपल्या जावळी बँकेला सुद्धा पोहोचली. परंतु व्यवस्थापनाने योग्य नियोजन करून बँकेने आपल्या व्यवसायात सातत्य ठेवले आहे. यापुढे अशा आव्हानांना सामोरे जाताना अधिकाधिक व्यवसाय वृद्धीसाठी बँकेच्या सर्व नूतन संचालक मंडळाने एकजुटीने प्रयत्नशील राहावे असे आवाहन दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी यावेळी केले.
दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे शांततेत पार पडली. यावेळी मानकुमरे बोलत होते,वार्षिक सभेस माजी आमदार सदाशिव सपकाळ, बँकेचे नुतन अध्यक्ष विक्रम भिलारे, उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी, माजी शिक्षण सभापती अमित कदम, किसनवीर कारखाना संचालक हिंदुराव तरडे, माजी अध्यक्ष राजाराम ओंबळे, चंद्रकांत गावडे, बाबुराव संकपाळ, योगेश गोळे आदी मान्यवर, संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बँकेच्या हितासाठी बँकेचे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याकरिता उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या सर्व सभासदांचे तसेच माजी संचालक सभासदांचे व निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींचे प्रारंभी वसंतराव मानकुमरे यांनी विशेष आभार मानले. बँकेचे अध्य़क्ष विक्रम भिलारे यांनी बँकेचे चालू आर्थिक वर्षातील कामकाजाचा व भविष्यकालीन ध्येयधोरणे कामकाजाचा आढावा सादर केला. बँकेने ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा सुविधा प्रदान करण्याचे धोरणांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता वाढविण्याचे बँकेचे प्रयत्न राहतील. बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून बँकेच्या सर्वांगीण विकासाकरिता सातत्यपूर्ण योगदान देण्यासाठी तसेच बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचा आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकासाचा दर उंचावण्यासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी आपण कटिबद्ध असून आजी -माजी संचालकांचे बँकेचे कामकाजात मोलाचे सहकार्य लाभत असल्याबद्दल सर्वांचे आभार देखील श्री. भिलारे यांनी मानले. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली,
व बँकेच्या प्रगतीसाठी पक्ष, गट तट बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचे अभिवचन दिले. प्रारंभी बँकेच्या अहवालाचे वाचन संचालक चंद्रकांत गावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन संचालक प्रकाश मस्कर यांनी केले. सभेस विठ्ठलराव देशमुख ,भानुदास जाधव, आनंदराव सपकाळ, श्रीरंग सपकाळ, मोहनराव मानकुमरे, प्रतापगडचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, चंद्रकांत पवार, अशोक चव्हाण, अस्मिता धनावडे, प्रतिभा सपकाळ, यशराज मानकुमरे, हरिभाऊ शेलार, एकनाथ ओंबळे ,आनंदराव गोळे, प्रकाश कोकरे,चंद्रकांत गवळी आदी मान्यवर सभासद कर्मचारी, उपस्थित होते.
बँकेचे संस्थापक परमपूज्य ह भ प वैकुंठवासी दत्तात्रय कळंबे महाराज, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय भिलारे गुरुजी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व बँकेच्या विकासात भर घालण्यास सर्वांची मदत होणे आवश्यक आहे
– माजी चेअरमन व विद्यमान संचालक चंद्रकांत गावडे