कुडाळ ता. 22 – आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास सातारा व जावली तालुक्यातील जनतेला आहे. या सरकार मध्ये सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य मिळावे व त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी या सदभावनेने पवित्र श्रावणमासात कुडाळचे जागृत देवस्थान श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिरात “लघुरूद्र महायज्ञ” हा धार्मिक सोहळा भाविकांच्या तसेच तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्तितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून “लघुरूद्र महायज्ञा” चे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार रविवार ता. 1 रोजी सकाळी 8 वाजल्यापसून सातारा येथील नामांकित 21 पंडीतांच्या उपस्थितीत होम हवन, धार्मिक विधी, मंत्रोच्चार, पूजा आदी धार्मिक विधी पार पडले, यावेळी जावली तालुक्यातील कुडाळ, मेढा, आनेवाडी विभागातील 11 उभयतांना पुजेचा मान देण्यात आला त्यानंतर ११.३० वा तालुक्याचे जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, व सैारभबाबा शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळावे व त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी सर्वांच्या उपस्थितीत संकल्प करण्यात आला त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते,
या धार्मिक सोहळ्यास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, कार्यकर्ते, ग्रामस्थ व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढील राजकीय वाटलासीसाठी घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या धार्मिक कायर्क्रमाचे कैातुक करून सैारभबाबा शिंदे यांना सर्वांच्या वतीने धन्यवाद देखील दिले.
सैारभबाबा शिंदे बोलताना म्हणाले, लघुरुद्र पूजा मंत्रामुळे, व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते,अशा प्रकारे महायज्ञ करणे ही भक्तीची, उपासनेची एक पद्धत आहे.ते वेदमंत्र असल्याने त्यात शक्ती आहे. मंत्रोच्चाराने ती शक्ती कार्यरत होते व अनुभवाला येते, आपल्या तालुक्याचे आमदार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य मिळावे व त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी या सदभावनेने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून तालुक्याच्या वतीने केलेल्या संकल्पाला नक्की यश मिळेल व जावलीकरांची अनेक वर्षापासूनची इच्छा बाबाराजेंच्या मंत्रीपदामुळे पुर्ण होईल. यावेळी तालुक्यातील सर्व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभारही त्यांनी मानले.