कुडाळ ता.27- सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी साठल्याने त्याठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असतें. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे. आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच केर कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
कुडाळ ता. जावली येथे साथ रोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत महास्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती नागराजन बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे,गटविकास अधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते,कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दडस,विस्तार अधिकारी सुरवासे,सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम, सदस्य वीरेंद्र शिंदे, धैर्यशील शिंदे, जगन्नाथ कचरे, दिलीप वारागडे, महेश पवार, ग्रामविकास अधिकारी रजनीकांत गायकवाड मुख्याध्यापक सैा. गायकवाड, दत्तात्रय तरडे सर्व शिक्षक, शिक्षिका ,व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंयतीच्या वतीने श्रीमती नागराजन यांचे सरपंच सुरेखा कुंभार यांनी स्वागत केले. यावेळी श्रीमती नागराजन यांनी ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पिंपळबन, प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन या माध्यमातून होणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रह भेटीद्वारे जनतेशी थेट संपर्क साधून घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. तसेच ज्या घराजवळ उघड्यावर पाणी साठवले जात असलेली भांडी तसेच टायर यासारख्या वस्तू नष्ट करण्यासाठी स्वतः प्रयत्न केला.
या दरम्यान त्यांनी स्वागत सत्कार स्वीकारण्या पेक्षा प्रत्यक्ष कामकाज करण्याकडे अधिक भर दिला.प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटी दरम्यान त्यांनी साथ रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाय योजना राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच ग्रामस्थांनी मागणी केलेल्या जलजीवन पाणी पुरवठा योजना त्वरित मार्गी लावण्याचे तसेच पिंपळबन साठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.