कुडाळ ता. 4 – कधी अती पाऊस तर कधी कडक दुष्काळ, वाढती उष्णता, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे, वातावरणातील बदल या सर्व बाबींना बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल
बिघडत चालला असून यावर माणसाने गांभीर्याने विचार केला पाहिजे तरच पुढच्या पिढीला जीवन सुसह्य होणार आहे. हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि झाडांचे, जंगलांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जावलीच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनक्षेत्राल अंकिता तरडे यांनी व्यक्त केले.
सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वनविभाग मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ ता.जावळी येथील महाराजा
शिवाजी हायस्कूल या विद्यामंदिरामध्ये वृक्षारोपण संपन्न झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तरडे बोलत होत्या. यावेळी प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे, वनपाल एस. व्ही. जाधव, विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दत्तात्रय तरडे, श्री जाधव, सौ पाटील, श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती कुंभार आदी शिक्षक शिक्षिका व मान्यवर उपस्थित होते. तरडे पुढे म्हणाल्या, एक जुलै हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस नाईक हे हरितक्रांतीचे जनक आहेत म्हणून एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
प्राचार्य दत्तात्रय तरडे म्हणाले, प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. `झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजेत असेही त्यांनी आवाहन केले, सूत्रसंचालन समृद्धी कोळी हिने केले.