कुडाळ ता. 2 – राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली असून त्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि डोमासाईल मिळवण्यासाठी ठिकठिकाणी महिलांची गर्दी होत आहे. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी जावळी तालुक्यातील विभागनिहाय सुविधा केंद्र सुरु करा आणि त्याठिकाणी त्या- त्या भागातील महिलांना आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करून द्या, अशा सुचना सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या होत्या त्यानुसार जावली तालुक्यात कुडाळ हे परिसरातील मोठे व बाजारपेठेचे ठिकाण असल्याने कुडाळ येथे तात्काळ शिबिर आयोजित करावे अशी मागणी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी तहसीलदार श्री हणमंत कोळेकर यांचेकडे सोमवार ता.2 रोजी तहसिल कार्यालयात जाऊन निवेदनाद्वारे केली आहे तसेच सदरच्या शिबिरासाठी सर्वोतोरपरी मदत करून प्रशासनास आवश्यक सहकार्य करण्यात येईल असे अभिवचनही सैारभ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. त्यानुसार कुडाळ ता.जावळी येथील स्वामी मंगल कार्य़ालय येथे बुधवार ता.3 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत महिलांच्या सोयीसाठी सर्कलनिहाय सुविधा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महिलांसाठीची योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल आदी कागदपत्रे आवश्यक असून ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सेतू आणि महा इ सेवा केंद्रांमध्ये महिलांची तुडुंब गर्दी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून भर पावसात महिला कागदपत्रे मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महिलांना लवकरात लवकर कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी जावली तालुक्यात विभागनिहाय सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहे, तरी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिरचा सर्व महिलांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी केले आहे.