कुडाळ ता. 18 – शैक्षणिक वर्षाचा शाळांचा पहिला दिवस नवागतांच्या स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने उत्साहात पार पडला. यावेळी लहान मोठ्या सर्वच मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कुडाळ ता.जावळी येथील जि.प. प्राथमिक केंद्रशाळा, महाराजा शिवाजी हायस्कूल व अंगणवाडी अशा गावातील अनेक शाळेत नवगतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्प, खाऊ आणि फुगे देऊन करण्यात आले.वाजत गाजत विद्यार्थी पालक, नागरीक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक यांनी नवीन विद्यार्थी यांची दींडी देखील काढली.
महाराजा शिवाजी हायस्कूल येथील इयत्ता पाचवी व आठवी व इतर वर्गातील नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे आरएसपी ट्रंम्प तर्फे संचलन करत सन्मानाने स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक श्री घुले सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना डेरीमिल्क चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यालयाच्या माजी प्राचार्या सौ एन एस पाटील व प्रभारी प्राचार्य दत्तात्रय तरडे, प्राथमिक शाळेच्या मुख्य़ाध्यापिका सैा. गायकवाड व सर्व शिक्षक आदी उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली. पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना मुलांची रडारड असायची, पण या अनोख्या पद्धतीने शाळा प्रवेश झाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. आहारात गोड पदार्थही देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी पाठ्य पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
अन् शाळेची घंटा वाजली…
दीड ते दोन महिन्याच्या कालावधी नंतर सोमवारी शाळेच्या घंटा वाजल्या, शाळेचा आजचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद दिसत होता. शाळेचा पहिला दिवस असल्याने काही पालक मुलांना चालत सोडायला आले होते, यावेळी मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता, शाळेत येताना नवा गणवेश, नवे दप्तर, नवे शूज परिधान केले होते. नवा वर्ग कसा असेल, नवीन मित्र मैत्रिणींची ओळख, मैत्री होणार, वर्ग शिक्षक कोण असणार याची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होती. दीड ते दोन महिने शाळेचा परिसर ओस पडला होता, शाळेकडील रस्ते सामसूम होते, आता शाळेला सुरुवात झाल्याने शाळेचा परिसरात पुन्हा विद्यार्थीची किलबिल ऐकू यायला लागली.