कुडाळ ता. 22 – आजचे युग हे स्पर्धेचे आहे आणि मुले या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी त्यांच्यात उच्च शिक्षणासोबत विविध कलागुण देखील असणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने करहर सारख्या ग्रामिण भागात ज्ञानाई इंग्रजी माध्यमाची शाळा कार्यरत असून येथील मुलांमध्ये ते सर्व कलागुण दिसून येत आहेत, तसेच शाळेतील शिक्षणाचा दर्जा देखील उत्तम असून या शाळेतील विद्यार्थी खऱ्या अर्थाने सर्वांगाने घडत आहेत याचे समाधान वाटते असे मत जावलीचे सुपुत्र व ठाणे जिल्हयात कार्यरत असणारे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
करहर ता.जावळी येथील ज्ञानाई प्रि प्रायमरी स्कूलचा स्नेहसंम्मेलन व बक्षिस वितरण सोहळा नुकताच पार पडला त्यावेळी ते बोलत होते, यावेळी कार्यक्रमास उद्योजक प्रमोद बारटक्के, करहर गावच्या सरंपच सौ सोनाली यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरपंच सैा. सोनाली यादव म्हणाल्या, मुलांच्या बौधिक वाढीसाठी, त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चांगला व विकसित असायला हवा, मुलांनी इंग्रजी माध्यामात शिक्षण घेतले तरी मराठी भाषेचे ज्ञान व माहीती सुध्दा असणे तितकेच गरजेचे आहे, ज्ञानाई शाळेतील विध्यार्थ्यांमध्ये दोन्ही भाषेचे कलागुण उत्तम प्रकारे दिसून येत आहेत, यातूनच उद्याचे कलाकार नक्की घडतील. प्रमोद बारटक्के बोलताना म्हणाले, हे स्नेहसंमेलन केवळ नाटय, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे भरभरून कौतूक देखील त्यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी बिरामणे यांनी मान्यवरांचे आपल्या शब्दसुमनांतून स्वागत केले व आपल्या भाषणातून शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. तसेच विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक व आभार व्यक्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले