जावळीजिह्वासहकार

जिल्ह्यातील अग्रणी कारखाना म्हणून ‘प्रतापगड’ची ओळख होईल- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ; ३ लाख मे. टन गाळप करून हंगामाची यशस्वी सांगता

कुडाळ ता.१५ – जावली तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था असलेला प्रतापगड साखर कारखाना ऊस पुरवठादार, शेतकरी,सभासद आणि कामगार यांच्या लाखमोलाच्या सहकार्यातून यंदाच्या हंगामासाठी गाळपासाठी पुन्हा सजज झाला. पहिल्याच गळीत हंगामात कारखान्याने ३ लाख १ हजार ५१ मे. टन उसाचे गाळप केले आहे. अनेक अडचणींवर मात करून कारखाना पुन्हा उभा राहिला. ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांनी असेच सहकार्य ठेवल्यास आज ना उद्या, दोन- पाच वर्षांनंतर प्रतापगड कारखाना हा सातारा जिल्ह्यातील उच्चतम दर देणारा कारखाना असा नावलौकिक मिळवेल, असा विश्वास अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

तीन- चार वर्ष बंद अवस्थेत असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने पुन्हा सुरु करण्यात आला. प्रतापगड कारखान्याचा पहिलाच गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न झाला. हंगामाची सांगता अंतिम ११ साखर पोत्यांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अधिकारी व कामगारांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, सातारा बाजार समितीचे संचालक अरुण कापसे, रवींद्र परामने, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, अनंत अडचणी असताना ऊस पुरवठादार शेतकरी आणि कामगार- कर्मचाऱ्यांच्या अनमोल सहकार्यामुळेच प्रतापगड कारखाना पुन्हा सुरु झाला आहे. स्वर्गीय लालसिंग काकांचे स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाले आहे. जावली, वाई, कोरेगाव तालुक्यातील उसपुरवठादार शेतकऱ्यांनी आपला ऊस पुरवला त्यांचे आणि सर्व कामगार- कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी मिळून सांघिक पणे एकत्रित काम केले आणि त्याचे फलित म्हणून जावलीतील शेतकऱ्यांचे हक्काचे सहकार मंदिर पुन्हा उभे राहिले. दराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रतापगड कारखान्याने ३ हजार रुपये प्रतिटन दरही दिला. आता हंगाम यशस्वीपणे संपन्न झाला आहे.

आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे. त्यामुळे पुढील हंगामातही सर्वांनी असेच सहकार्य कायम ठेवावे. आज ना उद्या, पुढील दोन- पाच वर्षात प्रतापगड कारखाना जिल्ह्यातील सर्वात जास्त दर देणारा कारखाना अशी ओळख कारखान्याची झाल्याशिवाय राहणार नाही.
कामगारांनी केलेल्या अनमोल सहकार्याची दखल म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रशासनाच्यावतीने त्यांना बक्षीसही देण्याची घोषणा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी केली. संस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. बँक व तोडणी वाहतूक यंत्रणा यांची देणी आहेत. त्यामुळे काटकसरीचे नियोजन करूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे. आगामी काळात डिस्टिलरी, इथेनॉल निर्मिती आदी प्रकल्प सुरु करून कारखान्याचे उत्पन्न्न वाढवण्यावर भर दिला जाईल. शेअर्स वाढवणे, टप्प्याटप्प्याने भागभांडवल वाढवणे हि कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे हि संस्था पूर्ण सक्षमपणे उभी राहावी यासाठी आपण सर्वांनी कायम सहकार्य ठेवावे, असे आवाहनही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केले. दरम्यान, तालुक्यातील विकासाबाबत बोलण्यापेक्षा मी कृतीतून माझे काम दाखवून दिले आहे. पाचवड, कुडाळ, मेढा ते शेंबडी या रस्त्याचे कामलवकरच मार्गी लागणार आहे. मुनावळे येथे जलपर्यटन सुरु केले आहे. तालुक्यातील पर्यटन वाढीवर भर दिला असल्याचेही ते म्हणाले.


प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले, बंद पडलेला कारखाना बाबाराजेंच्या साथीमुळे पुन्हा उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या सहकार्याने कारखाना यशस्वी गाळप करू शकला. अनेक अडचणी आल्या पण, बाबराजेंच्या पाठिंब्यामुळे ३ लाखापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने गाठले. पुढेही याच पद्धतीने प्रतापगड जिल्ह्यातील अग्रेसर कारखाना म्हणून नावारूपाला आणन्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी हंगामही यशस्वीपणे पार पाडू. आमदार शिवेंद्रसिंहराजेंमुळे जावलीतील गावागावात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही निवडणूकीची चिंता नाही पण, बाबाराजेंच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद मिळालेच पाहिजे, असेही शिंदे यांनी नमूद केले, यावेळी साखर पोती चे पूजन करून हंगामाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button