कुडाळ – प्रतिनिधी
निर्भीड व सडेतोड पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर भ्याड हल्ले होत आहेत. पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकार हल्लाविरोधी कायदा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही, असे मला आत्ताच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीच्या नोटिफिकेशनसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे वचन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मेडिक्लेम संदर्भात जिल्हा पत्रकार संघासमवेत चर्चा करून लवकरच धोरणात्मक निर्णय घेवू, अशी ग्वाही देत खा. उदयनराजेंनी जिल्ह्यातील पत्रकारांना आश्वस्त केले. दरम्यान, सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे फटाक्यांच्या आतषबाजीत, हलगी तुतारीच्या निनादात जल्लोषात व धूमधडाक्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
गोडोली येथे उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, माजी उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, मनोज शेंडे, टी.व्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, माझ्या राजकीय वाटचालीत सातारा जिल्ह्यातील पत्रकारांची खूप मदत झाली आहे. त्यामुळेच पत्रकार भवनासाठी हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी यांचा आग्रह झाल्यावर मी तो मोडू शकलो नाही. कारण मी त्यांच्याकडे मित्र म्हणून पाहतो. हे पत्रकार भवन साकारताना अॅड. डी. जी. बनकर, मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सुशांत मोरे, दिलीप चिद्रे यांनी जे परिश्रम घेतले आहेत ते कौतुकास्पद आहेत. सातारचे हे पत्रकार माझे एवढे मित्र आहेत की पत्रकारांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर त्यांच्या तावडीतून सुटका होणार नाही, अशी मिश्किलीही उदयनराजेंनी केली.
क्रांती घडवण्यात पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे. पत्रकारांना कायद्याचे संरक्षण मिळायला हवं. एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी जे सांगितले आहे त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुनकायद्यासाठी नोटिफिकेशन काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे, हे मी वचन देतो असेही उदयनराजे म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे व माझे वेगळे नाते आहे. त्यामुळे त्यांचा मेडिक्लेम करण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघासमवेत चर्चा करून आम्ही सर्वजण बसून धोरणात्मक निर्णय घेवू. मी माझ्या मित्रांकडे पत्रकार म्हणून पाहत नाही. आमचा एक ग्रुप आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी करावे लागेल, असेही उदयनराजे म्हणाले.
जिल्ह्याच्या विकासाच्या कल्पना पत्रकारांनी आम्हाला सांगाव्यात, सूचना कराव्यात. या सूचनांचे पालन केले जाईल. पत्रकारांना मी माझ्या कुटुंबाचा घटक मानतो. त्यांच्यासाठी राजवाडा कायम खुला आहे. कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. कुणी, कधीही मला भेटू शकतो, असेही उदयनराजे म्हणाले.
हरिष पाटणेंना पदावरून खालीच उतरू देणार नाही : उदयनराजेंची मिश्किली
आपल्या मनोगतात हरिष पाटणे यांनी पत्रकार भवनाची स्वप्नपूर्ती झाल्याने व आपण आता महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष असल्याने सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होवू इच्छितो, असे म्हंटले हाच धागा पकडून खा. उदयनराजे म्हणाले, हरिष पाटणे यांची पत्रकारांसाठीची तळमळ मी खूप जवळून पाहिली आहेे. हरिष पाटणे संघटनेच्या पदावरून आता बाजूला होतो असे म्हणाले आहेत. मात्र, ते फार हुशार आहेत, ते फॉर्म भरण्याच्या तयारीत असू शकतात. त्यामुळे मी त्यांना पदावरून खालीच उतरू देणार नाही, त्यामागे माझाही स्वार्थ आहे असा मिश्किल चिमटाही उदयनराजेंनी काढला.
एस. एम. देशमुख म्हणाले, राज्यात मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली पत्रकार एकत्र आले आहेत. पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे. पत्रकार हल्ला विरोधी कायदा झाला पण त्याची अंमलबजावणी होण्यासाठी नोटिफिकेशन निघाले नाही. यामध्ये पत्रकारांची फसवणूक झाली. कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी तीव्र लढा उभा करणार आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार हल्लाविरोधी कायद्याच्या नोटिफिकेशनसाठी भूमिका घ्यावी. याबाबतचे नेतृत्व करावे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे मेडिक्लेम निघाले तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसमोर हा आदर्श जाईल आणि तो आदर्श उदयनराजेंनी घालून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सातारा जिल्हा पत्रकार संघाने पत्रकारांसाठी विविध व नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून इतर जिल्ह्यांसमोर आदर्श उभा केला आहे. महाराष्ट्रातला हा आदर्श जिल्हा पत्रकार संघ आहे. हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी व त्यांच्या टीमने सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जे काही केले आहे त्यातील अनेक बाबी डॉक्युमेट्रीच्या माध्यमातून आज समजल्या. हरीष पाटणे यांची पत्रकारांबद्दल असलेली तळमळ त्यांनी केलेल्या कामातून दिसून येते. हरिष पाटणे यांनी थांबण्याची भाषा केली असली तरी हरिष पाटणे यांच्यासारख्या तरूण पदाधिकार्यांची मराठी पत्रकार परिषदेला गरज आहे. आम्ही कुठेही राजीनामा मागितलेला नाही त्यामुळे तो विषयच येत नाही. त्यांनी तालुक्या तालुक्यातले अनेक पत्रकार संघटनेला जोडून संघटनेचा आणखी विस्तार करावा, अशा शब्दात देशमुख यांनी पाटणे यांच्या नेतृत्वाला आणखी ताकद दिली. दरम्यान, सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उभारणीत योगदान दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यातील तमाम पत्रकारांतर्फे एस. एम. देशमुख यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे जाहीर आभार मानले.
किरण नाईक म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार संघाने हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ठ काम केले आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाने दिवंगत पत्रकारांना केलेली आर्थिक मदत हा राज्यातील इतर जिल्ह्यांसमोर आदर्श आहे. इतर जिल्ह्यांनीही सातार्यासारखे उपक्रम राबवायला हवेत, असे सांगितले.
हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या क्रांतिकारी पत्रकारितेचा आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे. खा. उदयनराजे भोसले हे या संकल्पपूर्तीचे जनक आहेत. एस. एम. देशमुख, किरण नाईक यांनी जिल्हा पत्रकार संघाची जबाबदारी आमच्यावर सोपवल्यानंतर आम्ही मित्रांनी एकत्रितपणे जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक धाडसी उपक्रम राबवले. मात्र सातारा जिल्ह्याचे हक्काचे पत्रकार भवन नव्हते. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, अॅड. डी. जी. बनकर, मनोज शेंडे, अभिजीत बापट, दिलीप चिद्रे, सुशांत मोरे, विनोद कुलकर्णी या सर्वांनी मिळून माझ्या कारकिर्दीतील स्वप्नपूर्ती केली हे मी कधीच विसरणार नाही. विशेषत: उदयनराजे भोसले हे शब्दाला जागणारे राजे आहेत त्यांचा सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकारांच्यावतीने मी आभारी राहीन. जिल्ह्यातील पत्रकारितेने माझ्यावर भरभरून प्रेम केले. या पत्रकारितेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जिल्हा पत्रकार भवनाचे स्वप्न पाहिले होते. त्याची स्वप्नपूर्ती झाल्याने आता सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची माझी इच्छा आहे, असेही पाटणे यांनी बोलून दाखवले. मात्र, उपस्थितीत पत्रकारांनी आम्हाला हे मान्य नाही, असे सांगितले.
विनोद कुलकर्णी म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावे, हे हरिष पाटणे यांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीत त्यांचा मित्र म्हणून मला योगदान देता आले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, अॅड. डी. जी. बनकर, मनोज शेंडे, अभिजीत बापट, सुशांत मोरे यांनी आम्हाला सहकार्य केले. संपूर्ण कार्यकारिणीने हरिष पाटणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. त्यामुळेच हे पत्रकार भवन उभे राहिले. पत्रकार संघाच्या वाटचालीत अडथळे आणणार्यांना आम्ही पुरुन उरलो. जिल्ह्यातील पत्रकारांना एकसंध ठेवायचे असेल तर नेतृत्व हरिष पाटणे यांच्याकडेच हवे अन्य कुणाचेही ते काम नाही. रात्री अपरात्री पत्रकारांच्या संकटांना धावून जाणारा हा आमचा लढवय्या मित्र आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही कुलकर्णी म्हणाले.
दरम्यान, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, अॅड. डी. जी. बनकर, अभिजीत बापट, मनोज शेंडे, दिलीप चिद्रे, सुशांत मोरे यांचा पत्रकार भवनाच्या योगदानाबाबत व एस. एम. देशमुख, किरण नाईक यांचा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक म्हणून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ‘स्वप्नपूर्ती या स्मरणिकेचे व भूमिशिल्प या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘मी अजिंक्यतारा बोलतोय’ या डॉक्युमेंट्रीचे यावेळी सादरीकरण झाले त्याला मान्यवरांसह जिल्ह्यातील पत्रकारांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
चौकट
उदयनराजेंचा शब्द ही गॅरंटी : अॅड. डी. जी. बनकर
गोडोलीत पत्रकार भवन उभे रहात असल्याने इथल्या भागातील समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. खा. उदयनराजे भोसले यांचा शब्द ही गॅरंटी असते. नवोदित पत्रकारांना हक्काचे घर मिळावे यासाठीही उदयनराजे प्रयत्नशील आहेत. जिल्हा पत्रकार भवन झाले असून नवोदित पत्रकारांच्या घरकुलाचे स्वप्नही लवकरच साकार करु. खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातार्यात महत्वाकांक्षी प्रकल्प उभे राहिले. ग्रेड सेप्रेरटर, कास धरण उंची वाढवणे, हुतात्मा स्मारक, शिवतीर्थ विकास, गोडोली तळे सुशोभिकरण अशी अनेक कामे मार्गी लागली, असेही अॅड. डी. जी. बनकर म्हणाले.
यावेळी बापूसाहेब जाधव, जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे, राजेश सोळसकर, घनश्याम छाबडा, अनिल देसाई, हंबीरराव देशमुख, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्य चंद्रसेन जाधव, गोरख तावरे, जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख दिपक शिंदे, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार कदम, पत्रकार हल्लाविरोधी समितीचे निमंत्रक राहूल तपासे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, सनियंत्रण समितीचे सदस्य तुषार तपासे, शंकर मोहिते, विद्या म्हासुर्णेकर, दत्ता मर्ढेकर, तुषार भद्रे तसेच जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य, तालुकाध्यक्ष व सदस्य, जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिकचे पत्रकार, डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
सुनील काटकर, काका धुमाळ, संग्राम बर्गे, रंजना रावत, विजय बडेकर, नासीर शेख, श्रीकांत आंबेकर, शिवानी कळसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन विठ्ठल माने व सुनील मोरे यांनी केले. आभार सनी शिंदे यांनी मानले.
दरम्यान, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते व किरण नाईक, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, अॅड. डी.जी.बनकर, अभिजीत बापट, मनोज शेंडे, शरद काटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात जिल्हा पत्रकार भवन- गोडोली नाका-हॉटेल लेक व्ह्यू अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.