कुडाळ ता. 10 – महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू आहे, त्याची व्याप्ती अधिक ऊस क्षेत्रावर होण्याची आवश्यकता असून ती मोठ्या प्रमाणावर वाढविणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या वर्षीचे दुष्काळाचे सावट विचारात घेता ठिबक सिंचन हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे मत व्यकत करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यवस्थापन, प्रमाणशीर खत व पाणी व्यवस्थापन या गोष्टींचे पालन केल्यास एकरी शंभर टन उत्पादन सहज शक्य आहे. असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच उत्तर व मध्य भारत नेटाफिम इरिगेशनचे कृषी तज्ञ अरुण देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले.
कुडाळ ता.जावळी येथे अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस खोडवा व्यवस्थापन आणि लागणीतून एकरी 100 टन उत्पन्नाचे उदिष्ठ या शेतकरी परिसंवाद कार्यक्रामवेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले,ऊसाचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी आता आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे, जास्त पाणी ऊस पिकाला हानिकारक ठरू शकते. म्हणून जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता योग्य असणे आवश्यक आहे. ऊस हे महाराष्ट्राचे प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे.
आधुनिक शेती पद्धतीमध्ये शेतजमिनीची चांगली मशागत, बियाणे निवड, खत व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यासारख्या गोष्टींचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला पाहीजेत. उसाच्या सिंचन व्यवस्थापनात ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास शंभर टक्के फायदा होऊन पाण्याची बचतही होते. पाण्यात विरघळणारी खतेही मुळांच्या सहवासात देता येतात आणि खतांच्या मात्रेतही बचत होते. केवळ उत्पादनच न वाढता पिकाची गुणवत्ताही सुधारते. एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रथमता दाट लागण करू नये, भरमसाट रासायनिक खतांचा वापर टाळावा, व गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. प्रत्येक तीन वर्षांतून हमखास माती परिक्षण करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे म्हणाले, अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या वतीने जावली तालुक्यातील प्रतापगड कारखाना सूरू करण्यात आला असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे, कारखान्याचा मुख्य घटक असलेल्या उसाचे क्षेत्र वाढावे,
तसेच शेतकऱ्यांनचेही उस पिकातून आर्थिक जीवनमान उंचावे या उद्देशाने दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस खोडवा व्यवस्थापन आणि लागण याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आयोजित केले असून या शिबिराचा शेतकऱ्यांना व कारखान्याला दोघांनाही नक्कीच फायदा होईल, यावेळी कार्यक्रमास उत्तर व मध्य भारत नेटाफिम इरिगेशनचे मुख्य सरव्यवस्थापक कृष्णात महामुलकर, पश्चिम महाराष्ट्राचे व्यवस्थापक राजकुमार माळी, कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड.शिवाजीराव मर्ढेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर भोसले, नेटाफिम इरिगेशनचे पदाधिकारी व अधिकृत विक्रेते यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी, सभासद उपस्थित होते, सरव्यवस्थापक कृष्णात महामुलकर यांनी सर्वांचे स्वागत केले.तर राजेंद्र भिलारे यांनी आभार मानले.