कुडाळ ता.28 – रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते,त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वावगे ठरणार नाही. ज्या रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले त्यांचे केवळ कैातुक न करता आभार मानले पाहीजेत असे मत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदिप शिंदे यांनी व्यक्त केले.
जावली तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय. लालसिंगकाका शिंदे यांच्या 98 व्या जयंती दिनी सोनगाव ता.जावळी येथे अजिंक्यतारा प्रतापगड साखर कामगारांच्या वतीने व अक्षय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी श्री शिंदे बोलत होते, पुढे ते म्हणाले, अनेक रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा नेहमीच जाणवत असतो त्यामूळे सामाजिक बांधिलकेचे भान ठेवून विविध कार्यक्रमांचे अैचित्य साधून ठिकठिकाणी असे रक्तदान शिबीर आयोजित करणे गरजेचे आहे. मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानतो असेही श्री शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय काकांना अनोखी आदरांजली वाहिली. यावेळी प्रत्येक रक्तदात्याना हेल्मेट, हेडफोन व पाण्याचा जार आदी वस्तू भेट म्हणून देण्यात आले. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत या शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी संचालक प्रदीप शिंदे, विठ्ठल मोरे, आनंदराव जुनघरे, दिलीप वांगडे, कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे व मान्यवर उपस्थित होते.