कुडाळ ता. 23 – अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करीत असताना संपूर्ण जावळी तालुक्यासह कुडाळ नगरीही पूर्ण राममय झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. कुडाळसह, मेढा, रामवाडी, हातेघर, आखाडे,अशा तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या गावागावांत सकाळपासून मंदिरांना लोकांनी भेटी देण्यास सुरवात केली होती. प्रत्येक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच रामरक्षा पठण, राम नामाचा जप, कीर्तन, भजन, प्रवचनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
त्यानंतर दुपारनंतर मंदीरांपासून गावातून भव्य पालखी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच मंदिरामध्ये दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. प्रत्येक गावात नागरिकांनी घरावर गुढी उभारली होती, तसेच घरांवर आकर्षक विध्युत रोषणाई, दारात रांगोळी काढून दिवे लावण्यात आले होते, भगवे ध्वज लावण्यात आले होते, त्यामुळे संपुर्ण वातावरण भक्तीमय व राममय झाले होते.
प्रभू श्रीराम भजन व गायनाचा कार्यक्रमानंतर अनेक ठिकाणी दीपोत्सवही साजरा करण्यात आला. गावागावांतील मारुती मंदिरात अखंड नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत भजन, कीर्तन व महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.प्रत्येक मंदिरात सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधी, अखंड रामनाम जप, रामरक्षा स्त्रोत्र पठण व हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. संध्याकाळच्या सत्रात गीतरामायण, दीपोत्सव, श्रीराम भक्तीवर आधारित भजनाचा कार्यक्रम व रात्री ८.३० वाजता महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.