जावळीजिह्वासामाजिक

तुमच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु ते ओबीसी मधून आम्ही देऊ देणार नाही – प्रा. लक्ष्मण हाके – वाई मध्ये ओबीसी समाजबांधवांचा एल्गार मेळावा संपन्न

कुडाळ ता . 19 -संविधानाने आम्हाला दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हजारो वर्षाच्या सामाजिक मागासलेपणा दुर करण्यासाठी ते आहे. सरकारच्या छत्रछायेखाली खोटे कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने आमच्या आरक्षणात हे वाटेकरी होऊ पाहतात. आमचा तुमच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु ते ओबीसी मधून आम्ही देऊ देणार नाही, असे मागासवर्ग आयोगाचे माजी संचालक प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे सांगितले. वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी पुणे येथील माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे – पाटील, ऑल इंडिया मुस्लिम समाज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दुल सतार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आदी उपस्थित होते. प्रा. हाके पुढे म्हणाले, भुजबळ साहेब हे तुमचा आमचा आवाज असून त्यांना पद्धतशीरपणे टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची, एकी दाखवण्याची ही वेळ आहे. ओबीसी मध्ये 450 जाती आहेत. जातनिहाय जनगणना करा. आम्ही 60% च्या वरती आहोत. सर्व सत्तास्थाने, कारखाने, डीसीसी बँक तुमच्या ताब्यात असताना, तुमचा समाज मागास कसा? यामुळेच सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले होते. ३.५ लाख कोटीचे महाराष्ट्राचे बजेट आहे. त्यातील ओबीसींसाठी ०.६% बजेटची तरतूद केवळ ओबीसींच्या विकासासाठी केली जाते. हे वास्तव तुम्ही जनतेसमोर का मांडत नाही? कुणबी दाखले मिळवून आमचे राजकीय आरक्षण हडपण्याचा डाव राजकीय मंडळींनी आखला आहे. कायदे करणाऱ्या सभागृहांमध्ये आमचे नेते किती याचा विचार समाजाने करावा. हे आरक्षण गेले तर पुन्हा 250 वर्षे मागे जाऊन आपण गुलामगिरीने जगायचे काय याचाही विचार समाजाने करणे गरजेचे आहे.

पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे म्हणाल्या, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु ओबीसी कोट्याला धक्का न लावता ते देण्यात यावे, यावर आम्ही ठाम आहोत. हा राज्यकर्त्यांनी घातलेला घोळ आहे. मराठा समाजातील नेत्यांना आम्ही मतदान करतो, परंतु ते आमचे प्रश्न मांडत नाहीत. हिम्मत आमच्यातही आहे हे जरांगे यांनी लक्षात ठेवावे. पाचवी शिक्षण असलेल्या जरांगे यांच्याकडून दुसरी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आम्हाला धमक्या देऊ नका, नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल. पुढील काळात ओबीसी मुखमंत्री झाला पाहिजे आणि तो आम्ही करणारच. मराठा नेत्यांनी केवळ त्यांच्या जातीचा विचार केला आणि बेकायदेशीर आरक्षण मिळवले तर आमच्या समाजाची मते त्यांना मिळणार नाहीत. यावेळी अब्दुल सुतार, भारत लोकरे, अशोक गायकवाड यांची भाषणे झाली. सी. व्ही. काळे, सौ. नीलिमा खरात, शिवाजी जमदाडे, शशिकांत कोरडे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्रा. शेखर फरांदे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. राजेश गुरव यांनी आभार मानले. कार्यक्रमांस राजेश गुरव, अविनाश फरांदे, दीपक ननावरे, बुवा खरात, डॉ. मकरंद पोरे, प्रा. शेखर फरांदे, सचिन फरांदे, सुरेश कोरडे, रवी बोडके, अरुण आदलिंगे, बापू जमदाडे, शशिकांत कोरडे, प्रवीण सोनवणे, प्रवीण कुंभार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button