कुडाळ ता. २५- बेकायदेशीररीतीने गुटखा व पान मसाला वाहतूक करणाऱ्या वाहनावर जावळी तालुक्यातील मेढा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका चारचाकी गाडीसह 5 लाख 76 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना कुडाळ- पाचगणी रस्त्यावर मंगळवार ता.२४ रोजी घडली. आकाश प्रकाश मोरे (वय- 32 वर्षे, रा. विराटनगर, अमृतवाडी, ता. वाई) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, जावळी तालुक्यातील हुमगाव गावचे हद्दीत न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज समोर छुप्या पद्धतीने गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मेढा पोलिसांना मिळाली. यावेळी त्यांनी सापळा रचून त्या ठिकाणी धडक कारवाई केली. यावेळी चार चाकी गाडीतील आकाश मोरे याच्या ताब्यातील पांढरे रंगाची ऑक्टावीआ स्कोडा कार क्रमांक (एम. एच. 14. सी. सी. 6161) वाहनाची तपासणी केली असता. त्यामध्ये एकुण 56 हजार रूपयांचा अवैद्य गुटखा आढळुन आला.
यावेळी पोलिसांनी बेकायदेशीर असलेला प्रतिबंधीत गुटखा व वाहन असा एकुण 5 लाख 76 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी अन्न व सुरक्षा अधिकारी यांचे फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदरची कारवाई पोलीस मेढा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर, डी. जी. शिंदे,सनी काळे, निलेश देशमुख, पोलीस पाटील आखाडे, योगेश शिंदे यांनी केली.