कुडाळ ता. 16 : पारंपरिक वाद्यांच्या गजरासह घोड्यांची मिरवणुक काढून कुडाऴ व परिसरात दुर्गादेवीचे जल्लोषी वातावरणात आगमन झाले. घटस्थापना करून सर्वत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. देवी आणि शक्तीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी अवघी कुडाळनगरी सज्ज झाली असून आदिशक्तीच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळी सात नंतर मुख्य बाजारपेठ मार्गावरून दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ कुडाळ व अंबिका माता कुडाळ यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. भव्य आणि सुबक अशा दुर्गामूर्तींची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मिरवणूक मार्गावर गर्दी केली होती.
दुर्गामातेच्या जयघोषात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपारिक ढोल-ताशा वाद्यासह डीजेच्या दणदणाटात दुर्गामातेची स्थापना केली. जय मातादी, दुर्गामाता की जय, उदं ग अंबे उदे ! अशा घोषणांनी कुडाळनगरीचा परिसर दणाणून गेला होता. नवरात्रोत्सवासाठी कुडाळ गाव नटले असून तुळजाभवानी मंदिर (कदम आळी), नवरात्रोत्सव मंडळ इंदिरानगर आदी मंडळांसह ग्रामदैवत श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय उत्सवासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन विविध मंडळांनी केले आहे.
गरबा, दांडियांचा आवाज घुमणार
मनाला सुखावणाऱ्या गीत, वाद्यांचा ताल अन् तालावरचे शिस्तबद्ध पदलालित्य यांचा सुंदर सोहळा म्हणजे गरबा. दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहाच्या लाटांवर पाऊले थिरकरणार आहेत. कुडाळ व परिसरात गरबा व दांडियांच्या खेळाची जय्यत तयारी वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळे, ग्रुपच्या माध्यमातून सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांसाठी आता तरुणाईमध्येऊत्साहाचे वातावरण राहणार आहे.