कुडाळ ता. 8 – भोंडला, हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्रातील विविध भागात एकच परंपरा जतन केलेली दिसून येते. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात हादगा म्हणून ओळखली जाणारी ही परंपरा महाराष्ट्रात भोंडला म्हणून प्रसिद्ध आहे. काळ बदलला, स्त्री रूपे बदलली, वरकरणी समाज बदलला असे थोडे वाटते, परंतु तळाशी जाऊन पाहिले तर स्त्री मनाची कुचंबणा,मानसिक घालमेल, भावनांचा कोंडमारा आजही आहे. कारणं वेगळी असतील, गरज आहे ती अशा परंपरा जपून ठेवण्याची आणि या माध्यमातून नवी ऊर्जा घेऊन पुन्हा भरारी घेण्याची!! आणि म्हणूनच फेसबुक, वाँटसँपच्या जमान्यातही कुडाळ ता.जावळी येथील सैा.उज्वला खटावकर यांनी आत्ताच्या नविन पिढीला समजण्यासाठी भोंडला हा पारंपारिक खेळ जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेनंतर संध्याकाळपासून पुढचे सोळा दिवस हा भोंडला महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी खेळला जातो. या काळात सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवास करत असतो तसेच पावसाचा देखील परतीचा प्रवास चालू होतो. . हादगा (भोंडला) ही हत्ती या मेघाचे प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली सांकेतिक पूजा आहे. महाराष्ट्रामध्ये मेघ-पूजनाची परंपरा खूप जुनी आहे. यामध्ये हत्ती हा समृद्धी, वर्ष, नाचे प्रतीक मानला जातो तसेच तो जलतत्वाचे देखील प्रतिनिधित्व करतो. यामधील लक्ष्मी, गौरी ही धरणीचे प्रतीक मानली जाते. पावसामुळे धरती सुजलाम- सुफलाम होते, तिची कुस उजवते. याचकाळात रब्बी हंगामाची पिके तरारून आलेली असतात. हे एक पर्जन्य विधीचे व्रत देखील मानले जाते.
अंगणात लाकडी पाट मांडून त्यावर हत्तीचे चित्र काढतात. दोन हत्ती सोंडेत हार घेऊन एकमेकांसमोर सोंड उंचावलेल्या स्थितीत असतात. हे चित्र खडूने काढतात किंवा रांगोळीने काढतात. काही ठिकाणी मूर्ती देखील ठेवतात. काही ठिकाणी पाच गोटे घेऊन त्यांची पाना-फुलांनीपूजा केली जाते, तर काही ठिकाणी अगस्त्याच्या ( हादग्याच्या) झाडाची फांदी मधोमध रोवून तिच्याभोवती फेर धरला जातो. या दिवसात मिळणाऱ्या फळ, फुल आणि धान्याने हत्तीची पूजा केली जाते. परिसरातील सर्व बायका मुली एकत्र येऊन पाटाभोवती फेर धरून भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
भोंडला गीत पाहण्यासाठी खालिल व्हिडीआो पहा..
भोंडल्याचे गाणे हा अस्सल लोकगीताचा नमुना आहे. अत्यंत साध्या चाली आणि मौखिक परंपरा! हस्त नक्षत्र आणि या उत्सवाचा अगदी जवळचा संबंध आहे. हस्त नक्षत्र ची पूजा करून त्याला नमस्कार केल्यावर मुसळधार पाऊस अर्थातच हत्तीचा पाऊस येतो असे मानले जाते. या भोंडल्यांमध्ये गाणे म्हणून झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटतात परंतु त्याला म्हणायचे ‘खिरापत’ आणि ही खिरापत काय आहे हे ओळखून दाखवावे लागते मगच वाटली जाते. पहिल्या दिवशी एक खिरापत दुसऱ्याशी दोन खिरापती असा रोज चढता क्रम असतो.भोंडल्याची गाणी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांचा बराचसा क्रम देखील ठरलेला आहे.
भोंडला गीत पाहण्यासाठी खालिल व्हिडीआो पहा..
मधल्या गाण्यांचा क्रम बदलला तरी ‘ऐलमा पैलमा’ हे सुरुवातीचे गाणे आणि ‘आड बाई आडोणी’ हेशेवटचे गाणे हमखास असते,यात बदल नसतो . रुसून बसलेली सासुरवाशीण माहेरचे गोडवे गाताना सासरला द्वाड म्हणते. परंतु या सासरचे मोठेपण कायम सोन्या चांदीच्या वस्तू तोलते.हा रुसवा देखील पती राजांच्या प्रेमाने जातो. अर्थातच कोणत्याही भौतिक सुखापेक्षा पतीचे प्रेम त्याच्या राणीला महत्त्वाचे वाटते. कारल्याच्या वेलीच्या गाण्यातून आज्ञाधारक सोशिक सून दिसते, तर वेड्याच्या गाण्यात वेड्याचे चाळे दिसतात अशी ही संपूर्णतया महिलाप्रधान असणारी परंपरा, नवरात्रात म्हणजेच शक्तीच्या महाउत्सवात आजही खूप ठिकाणी पाळली जाते. आणि भोंडला म्हणजे फक्त फेर धरून गोल फिरणे नव्हे तर त्यातून स्त्री मनाचा आविष्कार प्रगट होतो.