महेश बारटक्के -प्रतिनिधी
कुडाळ ता. 26 – गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात स्थापना करण्यात आलेल्या जावळीचा राजा राजमुद्रा मित्र मंडळाच्या 28 फुटांपेक्षा जास्त भव्य दिव्य व जावळी तालुक्यातील एकमेव उंच ठरलेल्या गणरायाची मुर्ती पाहण्यासाठी जावळी तालुक्यातील भक्तगण गर्दी करत आहेत,गेल्या आठ दिवसांपासून या भव्य दिव्य व आकर्षक अशा गणरायाचे दर्शन घेण्यासाठी कुडाळसह तालुक्यातून हजारो भाविक येथे येत आहेत,
गणपती स्थापनेच्या दिवशी तर हजारो युवकांच्या उपस्थितीत राजमुद्रा मित्र मंडळाच्या गणपतीची दिमाखदार मिरवणूक पाहून अनेकांच्या डोळ्याचे अक्षरशा पारणे फिटले. गणपती बाप्पा मोरया, या निनादाने कुडाळ बाजारपेठेचा रस्त्याचा परिसर दुमदुमला होता .वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या व डाँल्बीच्या निनादात स्थापनेच्या मिरवणुकीत विराजमान झाले होते,
राजमुद्रा मंडळाची दरवर्षी वेगवेगळ्या आकारात व भव्य दिव्य मुर्ती आणण्याचा मानस असतो, यापुर्वी मोठ्या व उंच गणेश मुर्ती केवळ शहरी भागात पहावयास मिळत होत्या, मात्र ग्रामिण भागात सुध्दा आता मोठमोठ्या व दिमाखदार मुर्ती स्थापन केल्या जात आहेत, या मुर्ती पाहण्यासाठी भक्तांमध्ये मोठी उत्सुकता असते, त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात राजमु्द्रा मंडळाने साकारण्यात आलेली ही गणरायाची मुर्ती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरत आहे.