कुडाळ ता. 14 – जावळी तालुक्यात सर्वाधिक गणेश मंडळे कुडाळ येथे असून, आगमन सोहळयासह येथे संपुर्ण गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पंरपरा असल्याने, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी गणेशोत्सव साजरा करताना शासकीय नियमांचे पालन करावे, डॉल्बी वापरल्यास आवाजाच्या क्षमतेची काळजी घ्यावी, संपुर्ण गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम राबवताना सामाजिकतेचे देखील भान ठेवावे असे आवाहन मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी बोलताना केले.
कुडाळ (ता. जावली) येथील श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिरात आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कुडाळ सह पंच्रकोशीतील विविध गावातील सार्वजनिक गणेश मंडळे, पोलीस पाटील, ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. तासगावकर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पोलिस कर्मचारी संभाजी बाबर, मनोज जायगुडे, दत्तात्रय शिंदे, अभिजित वागळे, यांच्यासह अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, पत्रकार उपस्थित होते. गावातील गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांची ऑनलाईन परवानगी घ्यावी, मंडप,स्टेज उभारताना रस्ता वाहतूकीस अडथळा होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही. तसेच स्टेज मजबूत असावे, पावसाळी दिवस असल्याने पत्राचे शेड असावे, जेणेकरून मूर्तीची विटंबना होणार नाही, वीज वापरताना वीज मंडळाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी वीज वितरण कडून परवानगी घ्यावी.
तसेच उत्सव काळात मंडळाजवळ कार्येकते उपस्थित असावेत, त्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांची नावे व नंबरची यादी मंडळात असावी, उत्सव काळात सामाजिक विषयांवरच देखावे असावेत, विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा व मोठ्या उंचीच्या मुर्ती असतील तर विसजर्नासाठी क्रेन व आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडून विसर्जन स्थळी लाईटची सोय करून घ्यावी, असे सांगून त्यांनी मंडळांच्या विविध समस्या यावेळी जाणून घेतल्या. व आवश्यक त्या सर्व सुचना मंडळांना दिल्या.