कुडाळ ता.4 : जालना येथे मराठा – समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवार ता. 4 रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती, या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद देत जावळी तालुक्यातील कुडाळ येथील सर्व व्यापारी, व्यवसायिकांनी स्वयंस्पुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. यावेळी पोलिसांचा मोठाबंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
जालना येथील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जावळी तालुक्यातही आजच्या बंदची हाक देण्यात आली होती, त्यानुसार सकाळी 10 वाजता कुडाळ ग्रामपंचायतीच्या समोर सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन मराठा – समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. सातारा जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिली असताना जालना येथील अंतरवाली सराटी गावातील आंदोलनात लाठीचार्ज व गोळीबार प्रकरणी महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चे सुरू आहेत. या लाठीमार प्रकरणाची चौकशी होऊन सर्व दोषींना तात्काळ निलंबित करावे त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षण विषयक मागण्या या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यादरम्यान येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट असेल किंवा प्रशासकीय, मंत्रालय पातळीवर असेल मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करून न घेतल्यास हा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा निर्धार सर्व समाजबांधवांनी व्यक्त केला. सोबत कोणतेही आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार, प्रकाश परामणे, विरेंद्र शिंदे आदींनी आपले मनोगते व्यक्त केली,
यावेळी कुडाळ सह, पंचक्रोशीतील सरताळे, म्हसवे, सोमर्डी ,सर्जापूर, बामनोली, सोनगाव, शेते यासह आजूबाजूच्या विविध गावातील मराठा बांधव उपस्थित होते. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या, मेढ्याचे सहाय्य्क पोलिस निऱिक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पेलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.