कुडाळ ता. 9 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा देश मेरी मिट्टी या उपक्रमाअंतर्गत जावली तालुका भाजपाच्या वतीने जावळीतील सर्व शाहिद कुटुंबियांची भेट घेऊन तसेच तालुक्यातील सर्व शाहिद स्मारकांना अभिवादन करून गावोगावची माती भरून त्याचा मंगल कलश जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे दिल्लीला पाठवण्यासाठी आज सुपूर्त करण्यात आला.
तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनाखाली सरताळे ता. जावली येथील हुतात्मा जवान सुरज मोहिते यांच्या वीर माता श्रीमती उषा सर्जेराव मोहिते यांच्या हस्ते स्मारकाशेजारची माती मंगल कलशात घेऊन स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.तदनंतर बामणोली तर्फे कुडाळ येथील शाहिद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर डेरेवाडी येथील हुतात्मा प्रथमेश पवार व करंदोशी येथील हुतात्मा तेजस मानकर यांच्या कुटुंबियांची सुध्दा भेट घेऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक अशोक महामुलकर यांनी मनोगत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोतस्वात सुरु केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. शाहिद जवानांच्या गावागावातून मूठभर माती मंगल कालशात भरून ती दिल्ली येथील शाहिद उद्यानासाठी नेण्यात येत असून, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्फत पाठवण्यात येणार असून त्यामुळे जावळीतील तमाम हुतात्मा झालेल्या विरांचा सन्मान होऊन त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील असा विश्वास तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी व्यक्त केला. यावेळी अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष समीर आतार, दिनेश गायकवाड, सरपंच सोनाली पवार, उमेश पवार, राजाराम पवार, स्वाती कचरे, अश्विनी बर्गे, सुनील धुमाळ, मोहन नवले, दस्तगीर शेख, बाजार समितीचे संचालक प्रमोद शिंदे, सरचिटणीस किरण भिलारे, रोहित नवसरे,विकास जाधव,सचिन महामुलकर तसेच भाजपा पदाधिकारी आणि आबनंद महाराज विद्यालयाचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामूहिक पांचप्रण शपथही घेण्यात आली.