कुडाळ: जावली तालुक्यातील उपक्रम आणि गुणवत्तेने जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कुडाळ शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले असून नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.
सन २०२२-२३ च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात कुडाळ शाळेच्या श्रेयस पवार,श्रेया धायगुडे,राजवीर शिंदे, सिद्धांत येवले या चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत कुडाळ शाळेची शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. शाळेचे एकूण २४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.या विद्यार्थ्यांना सौ.शोभा फरांदे, सौ. नीलिमा पवार , मुख्याध्यापिका जयश्री गायकवाड ,सर्व शिक्षक वृंद आदींचे मार्गदर्शन मिळाले.या यशाबद्दल जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ ,शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल, विस्तारअधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख अरविंद दळवी,पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य ,पालक, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.