जावळीजिह्वासामाजिक

हरीनामाच्या जयघोषाने “प्रतिपंढरपूर करहरनगरी” दुमदुमली : भाविकांच्या उत्साहाला उधाण – विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासुनच रांग

कुडाळ ता. 29 – जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र प्रतिपंढरपूर करहर नगरीत यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वैष्णवांचा मेळा जमला होता. टाळम्रदुंगाचा गजर आणि हरीनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला.विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासुनच रांग लागली होती. त्यातच पावसानेही उघडीप दिल्याने वारकर्यांसह भाविकांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. प्रतिपंढरीच्या यंदाच्या आषाढीला 75 वर्षे पुर्ण झाल्याने आजपर्यंतच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढत हजारो भाविकांनी आज विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेत आषाढीचा सोहळा दिमाखात व जल्लोषात पार पाडला.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी, या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रतीपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या करहर ता. जावली येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तसेच जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा भक्तीभावाने करण्यात आली.
यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पंत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला.

यावेळी तहदिलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, जावळी – महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, मेढा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर,करहरच्या सरपंच सैा. सोनाली यादव, माजी उपसभापती हणमंतराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते, शेतकर्यांची आर्थिक प्रगती व्हावी. तालुक्यातील सर्व जनतेला सुखसम्रुध्दी आणि उत्तम आरोग्य लाभावे असे साकडे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी याप्रसंगी विठुरायाला घातले.

आज सकाळ पासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून करहर नगरीत भाविक मोठ्या संख्य़ेने दाखल झाले होते. ज्यांना आषाढीसाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही असे विठ्ठल भक्त प्रतीपंढरपूर करहर नगरी मध्ये येवून आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेवून जीवनाचे सार्थक झाले असे मानतात.जावळी सहकारी बँकेचे संस्थापक ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून करहर नगरीच्या विठूमाऊलीचा लौकिक प्रतिपंढरपूर म्हणुन झाला. त्यांनी सुरु केलेल्या आदर्श परंपरे प्रमाणे महाराजांचे जन्म गाव असलेल्या दांडेघर पासुन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडी सोहळयाला सुरुवात झाली. या सोहळ्यात तालुक्यातील अनेक वारकरी दिंड्या पताका घेऊन सहभागी झाल्या होत्या. हा दिंडी सोहळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या बेलोशी या गावी आल्यानंतर महाराजांच्या समाधी समोर वारकर्यांनी किर्तन भजन केले. त्यांनंतर प्रतिपंढरपूर करहरच्या दिशेने दिंड्यांचे प्रस्थान झाले.टाळम्रदुंगाच्या गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकर्यांच्या भक्ती रसाचा महापूर यानिमित्ताने लोटला होता.


महुकुंडी येथे माऊलींच्या अश्वाचा रिंगण सोहळाही संपन्न झाला. हा दिंडी सोहळ्यात महु, दापवडी, रांजणी, वहागाव, विवर, कावडी, हातगेघर, पिंपळी, वालुथ, अशा विविध गावांतुन संत ज्ञानेश्वर, तुकाराम, अशा संत महंतांच्या पालख्या घेऊन हजारोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. सर्व दिंड्यांचे प्रतिपंढरपूर करहर येथे दुपारी पाच वाजता आगमन झाले त्यावेळी अक्षरश: भक्तीरसाला महापूर आला होता अशातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,व मान्यवरांनी टाळ मृदगांच्या तालावर तल्लीन होऊन दिंडीत सहभाग घेतला, .यावेळी दिंडीमधील महिलांनी फुगड्या खेळल्या तर तरुणाई सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये सामील झाली होती. हा सोहळा एक तास उत्साहात सुरू होता. न भूतो न भविष्यते असा हा सोहळा करहर नगरी मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आयेजत कार्यक्रमावेळी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, प्रत्येक वर्षी येथील सोहळा अधिकाधिक मोठा होत असून पुढच्या वर्षी हँलिकाँप्टरने दिंडी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा मानस असून लवकरच मंदिराच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात येणार असून भाविकांच्या अधिकाधिक सोईसुविंधासाठी व प्रतिपंढरपूर करहरच्या विकासासाठी कायम कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावळी नमूद केले. यावेळी जिल्हाय्तून आलेल्या मान्यवरांचा यात्रा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. नितिन गावडे यांनी आभांर मानले.

करहरनगरीच्या या आषाढी सोहळ्याला यंदाच्या वर्षी 75 वर्षे पुर्ण होत असल्याने यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात झाला. यामध्ये अभूतपूर्व अशी गर्दी पहावयास मिळाली. हा सोहळा नयनांचे पारणे फेडणारा असाच होता. न भूतो न भविष्यते असा हा सोहळा करहर नगरी मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. आलेल्या वारकर्यांना विविध सामाजिक व सहकारी संस्थांकडून तसेच विविध पक्षांच्या कार्यकत्यांकडून फराळाचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button