कुडाळ ता15 (प्रतिनिधी) : कवीला जात धर्म असतो. परंतु त्या कवीने आपल्या कवितेमध्ये मांडलेल्या वेदना आणि भावनेला जात धर्म नसतो. आजच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये जाती-धर्माचे विष कालवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी समाजामध्ये सांस्कृतिक संवादाची अतिशय गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.वल्लरी प्रकाशनातर्फे व्यंकटेश कल्याणकर यांनी संपादित केलेल्या “पारिजात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर, कवयित्री आश्लेषा महाजन, यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड, प्रकाश तांबे, मानसी चिटणीस, ज्योती इनामदार, अपूर्वा देव, महेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आज माणसा-माणसांमध्ये संवाद कमी होत चालला आहे. जर माणसांमध्ये संवाद राहिला नाही तर संस्कृतीमध्ये संवाद आणि त्याचा विकास कसा होणार. त्यामुळेच कवी आणि साहित्यिकांची समाजाला अत्यंत गरज आहे. साहित्याच्या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम आज होत आहे. कविता ही केवळ साहित्य नव्हे तर एकात्मतेची भावना निर्माण करण्याचे साधन आहे.डॉ. बबन जोगदंड म्हणाले, समाजामध्ये प्रबोधन होण्यामध्ये कवींचे मोठे योगदान आहे. कविता हे केवळ साहित्य नव्हे तर तो एक इतिहास आहे. ज्याप्रमाणे पुस्तके माणसं घडवतात, त्याचप्रमाणे कवितांमधून समृद्ध समाजाची निर्मिती होत असते.अशोक इंदलकर म्हणाले, सर्वांना प्रसन्न करणारे संगीत आपण नेहमी ऐकतो त्या संगीताचे मूळ हे कवितेमध्येच असते. पोलीस खात्यामध्येही हळव्या आणि कलात्मक मनाची अनेक माणसे आहेत. पोलिसांचेही समाजाच्या रक्षणासोबतच साहित्य क्षेत्रातही योगदान आहे.आश्लेषा महाजन यांनी पारिजातमधील कवितांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, “कविंनी मोठ्या प्रमाणात लिहिणे ही अभिव्यक्तीची लोकशाही आहे. लिहिताना स्वतः:साठी लिहिण्याबरोबरच समाजासाठी लिहावे.”
सुनील वेदपाठक म्हणाले, कविता हा अत्यंत अवघड साहित्यप्रकार आहे. कविता कोणालाही शिकविता येत नाही किंवा त्या संबंधात कोणालाही मार्गदर्शन करता येत नाही. कवितेचा आनंद केवळ कवीलाच नव्हे तर ती कविता वाचणाऱ्यालाही घेता आला पाहिजे .कविता हे एक प्रतिभा संपन्नतेचे लक्षण आहे.मानसी चौगुले, शुभांगी जाधव, मुकुंद काजरेकर, सुरेश काळे, प्रशांत लिंगाडे, वैशाली मराठे, चंचल मुळे, छाया नागर्थवार, निशिगंधा निकस, मंजुषा पागे, रसिका पनके , श्रीपाद पसारकर, प्राजक्ता राजोपाध्ये, अनघा सांगरुळकर, मीनाक्षी शीलवंत, जयश्री श्रीखंडे आदी कवींनी यावेळी आपल्या कविता सादर केल्या.व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा कल्याणकर यांनी निवेदन केले आरती परळकर यांनी स्वागत गीत तर कीर्ती देसाई यांनी पसायदान म्हटले. मानसी चिटणीस यांनी आभार प्रदर्शन केले.