कुडाळ ता. 15 – सोनगांव ता. जावली येथे सहकारमहर्षी स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. १३ मे ते शुक्रवार दि. १९ मे या कालावधीत कथाकार, रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक (नागपूरकर) यांच्या संपूर्ण तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ सातारा जावळीचे आमदार श्री..छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी ढोक महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, जावली तालुक्यातील पदाधिकारी ज्ञानदेव रांजणे, जयदिप शिंदे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूह, जावली यांच्यावतीने सोनगांव- विद्यानगर येथील श्री. धुंदीबाबा विद्यालयाच्या भव्य प्रांगणात या धार्मिक व लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १३ ते शुक्रवार दि. १९ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.४५ ते रात्री ९.४५ या वेळेत हा कर्यक्रम होणार आहे. शनिवारी ग्रंथ महात्म्य व शिवपार्वती विवाह, रविवारी श्रीराम जन्मकथा, सोमवारी सीतामाई स्वयंवर, मंगळवारी केवट कथा, बुधवारी सीतामाई हरण, गुरुवारी लंका दहन आणि शुक्रवारी रावण दहन व श्रीराम राज्याभिषेक रामायण कथा सांगता होणार आहे.
या भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रमासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले असून सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी ढोक महाराजांच्या या सुश्राव्य तुलसी रामायण कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.