कुडाळ ता.16 – जावली तालुक्यातील करंदोशी गावचे सुपुत्र वीर जवान तेजस मानकर आज रविवार ता. 16 रोजी अनंतात विलिन झाले. हजारो जावलीकरांच्या उपस्थितीत साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रविवारी एकच्या सुमारास करंदोशी या ठिकाणी मोकळ्या पटांगणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. वीरजवान अमर रहे.. भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर भारावून गेला होता.
वीर जवान तेजस मानकर नुकतेच भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. प्रशिक्षण संपूनत्यांची पंजाब येथील भटिंडा या ठिकाणी नेमणूक झाली होती. कर्तव्य बजावत असताना गोळी लागून त्यांना वीरमरण आले ही बातमी समजताच करंदोशी गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली. शुक्रवारी रात्रीपासून त्यांचे पार्थिव येण्याची ग्रामस्थ वाट व्यवस्था पाहत होते. रविवारी सकाळी आठ वाजता पाचवड येथून खास सजवलेल्या वाहनातून त्यांच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला. सरताळे ,म्हसवे ,कुडाळ, सोनगाव, भिवडी या गावातील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला रांगोळी काढली होती. ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून वीर जवान यांना आदरांजली वाहण्यात आली.
रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून आपल्या लाडक्या सुपुत्रला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गावकरी रस्त्याच्या कडेला उभे होते. दोन्ही बाजूला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अमर रहे हमारे तेजस मानकर अमर रहे च्या घोषणा देत अंत्ययात्राकरंदोशी गावात आल्यावर कुटुंबीयांसह अवघे गाव शोकाकुल झाले होते. तेजस यांचे पार्थिवकरंदोशी येथील त्यांच्या घरी काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पार्थिव घरी पोहचताच जवान तेजस यांच्या आईने व कुटुंबियांनी केलेला आक्रोश उपस्थितीतांचे मन हेलावून टाकणारा होता. परिसरातील गावागावातील आबालवृद्ध, महिला ,युवक शहिद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पहाटे पासूनच मोठया संख्येने त्यांच्या घराजवळ उपस्थित होते.
यानंतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर पार्थिव अंत्यविधीसाठी नेण्यात आले. याठीकणी पोलीस दलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा परिषद माजी शिक्षण अर्थ सभापती अमित कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, यांच्यासह तहसीलदार राजेंद्र पोळ, विभागीय पोलीस अधिकारी शितल दानवे खराडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच विविध क्षेत्रातीलमान्यवरांनी पुष्पकचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
देशसेवा करताना तेजस शाहिद झाला – लहुराज मानकर :
आमच्या घरात सैनिकी परंपरा असल्याने सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय तेजसने स्वयं स्फूर्तीने घेतला होता. वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्या अगोदरच पहिल्याच प्रयत्नात त्याची निवड झाली. तो मनमिळाऊ तसेच हरहुन्नरी असल्याने कुटुंबातील सर्वांचा लाडका होता. नातेवाईक आणि ग्रामस्थांनाही त्याचा खूप लळा होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजल्या नंतर पंजाब भर्तीडा येथील सैन्य तळावर आपण गेलो होतो. तिथे सुद्धा त्याने सर्वांची मने जिंकली होती. तेथील वरिष्ठ व त्याचे सहकारी त्याला प्रेमाने छोटू म्हणतं होते असे त्याच्या सहकार्यांनी सांगितले. या आठवणी सांगताना कंठ दाटून येत होता. शब्द फुटत नव्हते. पोटचा मुलगा गेल्याचे दुःख आहे परंतु त्याने देशासेवा करताना बलिदान दिल्याचा अभिमान असल्याचे वडील लहुराज मानकर यांनी सांगितले.
बुधवारी सकाळीच मी त्याच्याशी फोन वर बोललो होतो. त्यावेळी त्याने अदाल्यादिवशी झालेल्या हल्यात चार जवान शहीद झाल्याने सर्वाना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे. आणि मी सज्ज आहे. काळजी करू नका असे त्याने सांगितले. परंतु त्यानंतर नेमके काय घडले याचा तपास सुरु असल्याचे लहुराज मानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मानकर कुटुंबियांचे देश सेवेत मोठे योगदान – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
स्वतः देशसेवेत सुभेदार मेजर पर्यंत मजल मारून आपले दोन्ही पुत्र देश सेवेसाठी देणारे मानकर कुटुंबातील आदर्श घेण्यासारखा आहे. दुर्दैवाने देशासेवेचे स्वप्न पाहणारा बावीस वर्षाचा कोवळा तरुण आपल्यातून अचानक निघून जाणे अतिशय दुःखद आहे. या प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी सर्वांनी धीर द्यावा.
मानकर कुटुंबियांना न्याय मिळवून देणार – खासदार उदयनराजे भोसले –
सातारा जिल्ह्याला सैनिकी परंपरा आहे. अनेक तरुण देश सेवेचे ध्येय उराशी बाळगून सैन्य दलात भरती होत आहेत. त्याच प्रमाणे तेजसही आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेहण्याचे ध्येय उराशी बाळगून सैन्य दलात दाखल झाला. परंतु एवढ्या कोवळ्या वयात त्याला दुर्भाग्य पूर्ण वीर मरण आले. त्याठिकाणी काय घडले याचा पाठ पुरावा करून आपण मानकर कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.