कुडाळ ता.14 – जावली तालुक्यातील करंदोशी गावचा तेजस लहुराज मानकर (वय 22 ) वर्षे या जवानाला पंजाब भटिंडा कॅम्प मध्ये सेवा बजावत असताना डोक्यात गोळी लागली. त्यालाउपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तेजस यांना गोळी कशी लागली याबाबत पोलीस शोध घेत आहेत. या युवा जवानाच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण सातारा जिल्ह्यासह जावली तालुक्यावर शोककळा पसरली. जवान तेजस मानकर याचा या गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना केलेल्या मेलनुसार जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपार पर्यंत त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तेजसच्या पश्चात आई मनीषा, वडील लहुराज, भाऊ मेजर ओंकार असा परिवार आहे.
शहीद जवान तेजसचे वडील सैन्यदलात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तर भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहे. तसेच चुलते शशिकांत मानकर हे सुद्धा सैन्य दलात सेवा बजावत आहेत. आई मनीषा मानकर गृहिणी आहेत. सैन्य दलातून देश सेवा करण्याची परंपरा या मानकर कुटुंबियांत आहे. दोन वर्षा पूर्वी तेजस सैन्य दलात दाखल झाला होता. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची पंजाब भटिंडा येथे नियुक्ती करण्यात आली होती.
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहिती नुसार तेजस नुकताच यात्रे निमित्त सुट्टी घेऊन गावी आला होता. पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी तो पाचच दिवसांपूर्वी गेला होता. यात्रे दरम्यान तेजसने नातेवाईक आणि मित्र परिवारा सोबत केलेल्या मौज मजा व गप्पा गोष्टीच्या आठवणी अगदी ताज्या असतानाच तो शहीद झाल्याचे वृत्त समजताच सारा परिसर गहिवरला. तेजसचे प्राथमिक शिक्षण गावी झाले. अत्यंत हुशार, हजरजबाबी व मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा आहे. वडील व भावाप्रमाणे आपणही आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तेजस दोन वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाला होता. आता ग्रामस्थ तेजसचे पार्थिव येण्याची प्रतीक्षा करत आहेत. अत्यन्त जड अंतःकरणाने तेजसच्या अंतिम निरोपची तयारी त्याचे मित्र व ग्रामस्थ करत आहेत.