कुडाळ ता. 5 – सनईचा सूर, फुलांची आकर्षक सजावट, ढोल तांशांच्या गजरात व भाविकांच्या अपार उत्साहात कुडाळ ता.जावळी येथील श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर व श्री जोगुबाई व श्री आनंदीबाई यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व भक्तीमय वातावरणात पार पडला. हा अनोखा उत्सव डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविकांनी कुडाळनगरीत हजेरी लावली होती.
प्रतिपंरंपरेप्रमाणे चैत्र पैार्णिमेला श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर यांचा विवाह सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. या निमित्त कुडाळ येथील ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान देवांच्या विवाह सोहळ्यानिमित्त एक दिवस आधी देवांच्या हळदीचा सोहळा आयोजित करण्यात येतो, त्यानंतर चैत्र पैार्णिमेला रात्री ठिक 12 वाजता श्रींचा शाही विवाहसोहळा संपन्न् होतो. दरम्यान विवाह सोहळाचे औचित्य साधून संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आनंदीबाई व जोगुबाई देवींची मंदिरे फुले लावून सजवली होती.तर ज्या सभामंडपात विवाह सोहळा पार पडला, तेथे सर्वत्र फुलांनी अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती.
रात्री 11 वाजता वाजत गाजत श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर यांच्या मुर्ती पालखीतून मिरवणुक काढून श्री आनंदीबाई व जोगुबाई देवींच्या मंदिरांत नेण्यात आल्या त्यानंतर श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर व श्री जोगुबाई व श्री आनंदीबाई यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व विधीवत पध्दतीने साजरा करण्यात आला. चारही देव देवींना सुंदर असे मखमली पोशाख परिधान करण्यात आले होते, तसेच संपुर्ण मुर्त्यांवर आकर्षक दागिणे मडवण्यात आले होते, रात्री 12 वाजता शुभमंगल सावधान म्हणत मंगलअष्टका सुरू झाल्या व सव्वा बारा वाजता देवाचे लग्न संपन्न झाले. यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी कुडाळ नगरीत…काय वाजत गाजतं… सोन्यांच बाशिंग…लगीन देवाचं लागलं म्हणत भक्तीभावाने आनंद साजरा केला.
यावेळी करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतीषबाजी डोळ्याचे पारणे फेडणारी होती. हजारो भाविक या शाही विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. मागील काही वर्षापासून श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर यांच्या विवाह सोहळ्यामध्ये जिल्ह्याबाहेरूनही भाविक येत आहेत. यंदा देखील मोठी गर्दी झाल्याने उपस्थितांना हा सोहळा व्यवस्थित पाहता यावा यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने मोठ्या व्हिडीआो स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे अनेकांना हा सोहळा व्यवस्थित बसून बघत सोहळ्याचा आनंद घेता आला.