कुडाळ ता. 24 – महाराष्ट्रामध्ये गुढी पाडवाचा सण साजरा केल्यानंतर दुसर्या दिवशी स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन अनेक भाविक मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी हा दिवस 23 मार्च गुरूवार दिवशी आला होता, वाई तालुक्यातील कदमवाडी (आोझर्डे) येथील श्री स्वामी समर्थ मठ -मंदिरांमध्ये पहाटेपासून श्री स्वामी समर्थ..जय जय स्वामी समर्थचा जयघोष…स्वामींच्या उत्सवमूर्तींवर अभिषेक, पूजाअर्चा आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करत बुधवारी चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भाविकांच्या मान्यतेनुसार चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले होते त्यामुळे हा त्यांचा प्रकटदिन असतो. स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकटदिनानिमित्त कदमवाडी (आोझर्डे) येथील स्वामींच्या मठात या दिवसाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. स्वामी भक्तांना तो विविध रूपात अनुभवता आला. त्यांनी भाविकांना अनेक लीला दाखवल्या. ”भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.” या त्यांच्या अभिवचनावर विश्वास ठेवून आज अनेक स्वामी भक्त आयुष्याची वाट चालत आहेत कदमवाडी (आोझर्डे) येथील स्वामींच्या मठात श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांकडून मंदिरांमध्ये महाप्रसादासाठी शिधा, फळे, प्रसाद देण्यात येत होता. येणारे भाविक एकमेकांना स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या शुभेच्छा देत होते. यावेळी मठात गायन, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम आयोजिले होते.
मठाचे प्रमुख संतोष महाराज कदम म्हणाले, ‘‘पहाटे स्वामींच्या मूर्तीस अभिषेक झाल्यानंतर प्रगट दिनाचे कीर्तन झाले. आनंदकाडसिध्देश्वर महाराज यांच्या आशिर्वादाने मंदिरात स्वामींची पालखी सोहळा व भाविकांना दर्शन, भजन किर्तन व त्यानंतर अन्नदान करण्यात आले.’’ व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे कऱण्यात आले.यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तसेच मंदीरातही फुलांची व फळांची सजावट करण्यात आली होती. यावेळी दिवसभरात अंदाजे 5 हजाराहूंन अधिक भाविकांनी दर्शन घेतले.