कुडाळ प्रतिनिधी- बोंडारवाडी ग्रामस्थांनी ५४ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरणाकरिता अधिका-यांना सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन करीत बोंडारवाडी गावचे आधी पुनवर्सन नंतर धरण यासाठी मी बोंडारवाडी ग्रामस्थांबरोबर आहे असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
जावली पंचायत समितीच्या सभागृहात बोंडारवाडी धरणा संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, पं.स. माजी सदस्य विजयराव सुतार, मोहनराव कासुर्डे, हरिभाऊ शेलार, बबन बेलोशे, निर्मला दुधाने, कविता धनावडे, गिता लोखंडे, शकुंतला भिलारे, राजू जाधव, विलास शिर्के, सागर धनावडे, सुनिल जांभळे रामभाऊ शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. भोसले म्हणाले उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. पाटणकर उपस्थित असताना जलसंधारण मधुन बोंडारवाडी धरण बांधण्या संदर्भात सकारात्मक विचार होवुन जलसंधारणाला बोंडारवाडी धरणाचा सर्वे पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७० ते ७५ लाख रुपये सर्वे करण्यासाठी जलसंधारणाला मिळणार आहेत असेही आ. भोसले यांनी सांगीतले. ते पुढे म्हणाले कण्हेर धरणा मधुन एमआयडीसी आणि शेती व पिण्यासाठी आपला रिझर्व्ह असणारा पाणीसाठा हा एक टीएमसी पेक्षा जास्त आहे आणि त्याच रिझर्व पाणी साठ्याचे ना. फडणवीस साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्याने आता धरण बांधण्याच्या बाबतीत कोणतीच अडचण येणार नाही.
आपण कोणाचेही पाणी काढून घेणार नसून आपल्या हक्काचेच ते पाणी आहे आणि ते पाणी साठविण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधायचे आहे. ज्यामुळे ५४ गावच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे असे ही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगीतले. बोंडारवाडी धरणाच्या सर्वेक्षणास आता सुरुवात होणार आहे. धरणाच्या प्रशासकीय व तांत्रीक बाबींना सुरवात होईल. हे धरण आपल्या ५४ गावांच्या साठीच असल्याने बोंडारवाडी ग्रामस्थांनी धरण होण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन करीत आधी पूर्नवसन मग धरण हा कायदाच असल्याने प्रथम पूर्नवसन करण्यासाठी मी
ग्रामस्थांच्या बरोबर आहे असेही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगीतले.
कै. मोकाशी साहेब हे धरण होण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांचा वाढदिवसा दिनी देहांत झाला. त्यांचे स्वप्न बोंडरवाडी धरण बांधुन पूर्ण करुयात असे सांगताना बोंडारवाडी ग्रामस्थांच्या विचाराने लवकरच पुर्नवसन अधिकार्याच्या सोबत बैठक घेवु. तसेच टँकर मुक्त गावे होण्यासाठी आणि शासनाचा टंचाई खर्च वाचण्यासाठी शासनाने बोंडारवाडी धरणास लवकर सुरुवात करावी अशी मागणीही केल्याचे यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगीतले. यावेळी ५४ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. रामभाऊ शेलार यांनी आभार मानले.