कुडाळ ता.3 -जावली तालुक्यातील कुडाळ नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन सुरु असल्याने कुडाळ परिसरातील वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले आहे ता. 25 फेब्रुवारी ते 04 मार्च दरम्यात होत असलेल्या या पारायण सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रोज आपल्या अभूतपूर्व वाणीतून संतवाणी व संतांचे आचार-विचार ग्रामस्थांच्या समोर मांडत असून या कीर्तनाने संपूर्ण वातावरण ज्ञानोबा माऊलीच्या असीम भक्तीने नाहून निघाले आहे.
अखंड हरिनामाच्या गजराने कुडाळ नगरी दुमदुमून गेली आहे या सोहळ्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पहाटे काकडा, सकाळी 7 ते 11 व दुपारी 2 ते 5 ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन व रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत किर्तन होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार ह.भ.प. ह.भ.प.जगन्नाथ महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज खराडे,ज्ञानेश्वरीताई पुजारी, अमोल गुरव, लक्ष्मण महाराज नलवडे, हणमंत महाराज रणवरे, दिलिप महाराज ठाकरे तर 04 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 रघुनाथ महाराज मर्ढेकर यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आव्हान आयोजक सर्व ग्रामस्थ कुडाळ यांचेतर्फे करण्यात आले आहे.
– किर्तनातून समाजप्रबोधन व देशभक्ती
साधू संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख असताना समाजाला अध्यात्माची गोडी लावून समाजाला चाकोरीत ठेवण्यासाठी सगळ्याच संतानी विपुल प्रमाणात अविट अशी संतसाहित्याची निर्मिती केली. संतसाहित्याचा हा अमृतरस अभंग, भारुड, ओवी, हरिपाठाच्या रुपाने आजही समाजाच्या ओठावर तरंगताना दिसत आहे. साहित्याचा प्रचार प्रसार करत गावोगावी कीर्तन करणारे कीर्तनकार आपल्या किर्तनातून व्यसनमुक्ती, साक्षरता, बेटी बचावो, देशभक्ती, छत्रपतीशिवाजी महाराजांची शैार्यगाथा आदी विषयांवर समाजात उत्तम प्रकारे समाजप्रबोधन करत आहेत.