कुडाळ ता. 20 – (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून भारतभर भगवा झेंडा फडकवीला. निजामशाही व आदिलशाहीच्या विरोधात झुंज देत रयतेचे राज्य निर्माण केले, दिल्लीचा बादशहा देखील त्यांच्या समोर झुकला होता, त्यांच्यामुळेच मराठी मावळ्यांनी अटकेपार भगवा झेंडा रोवला. त्यांच्या या पराक्रमाची महती जम्मू वासियांनाहोण्यासाठी जयहिंद फॉउंडेशनच्या वतीने जम्मू येथे शिवजयंती साजरी करण्यात आली
शिवजयंती साजरी करण्यासाठी जयहिंद फॉउंडेशनच्या कोल्हापूर, सातारा, जावली, वाई, कोरेगाव, खटाव, कराड, पुणे, बारामती, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, गोवा, उत्तर प्रदेश शाखेतील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जम्मू येथील महाराजा हरिसिंग पार्क ते बलिदान स्तंभ या दरम्यान रॅली काढण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव या घोषणानी परिसर दुमदुमन गेला. यावेळी जयहिंद फॉउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे राष्ट्रीय संचालक डॉ. केशव राजपुरे, जम्मू राज्य अध्यक्ष तसरीम मन्हास,पदाधिकारी व सदस्य.मनीषा अरबूने, महिला सातारा जिल्हाध्यक्ष उर्मिला कदम, दत्ता साळुंखे रविंद्र कदम, सचिन कुंभार, वैभव कदम यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास साडे तीनशे वर्ष झाली तरी अजूनही प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. त्यांच्या पराक्रमाचे तेज अजूनही झळाळत असून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांच्या पराक्रमाचा इतिहास ऐकला जातो. शिवाजीमहाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेत स्वराज्य निर्माण केले म्हणून तर आपण आज सर्वजण एक आहोत. त्यांचे हेच कार्य सर्वांसमोर जाण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात शिवजयंती साजरी झाली पाहिजे म्हणून जम्मूमध्ये प्रथमच जयहिंद फॉउंडेशनच्या वतीने शिवजयंती साजरी करीत आहोत.
जयहिंदचे जम्मू राज्य अध्यक्ष तसरीम मन्हास म्हणाले,जम्मूमधील हिंदू लोकांच्या मनात शिवाजी महाराजांचा पराक्रम अजूनही स्मरणात असून त्यांच्या लोकोपयोगी निर्णय राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे म्हणाले, शिवाजी महाराजांनी स्वराज्यहितासाठी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी कायम आपल्या मावळ्यांना व रयतेला समानतेची वागणूक दिली व त्यांच्यासाठी आपले आयुष्य झिजविले. त्यांच्या कार्याच्या प्रेरनेतून जयहिंद फॉउंडेशन देश सेवेसाठी आयुष्य खर्च करणाऱ्या सैनिक व त्यांच्या परिवारसाठी काम करीत आहे. यावेळी जयहिंद फॉउंडेशनच्या वतीने रॅली व शिवजन्मोत्सव कार्यक्रम व ऐतिहासिक कार्यक्रम घेण्यात आले. या शिवजयंतीकरीता पाच वर्षांच्या मुलांच्या पासून ७५ वर्षाच्या महिलांची देखील उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुलभा लोखंडे, संस्कृती दळवी, हेमलता फडतरे, उर्मिला कदम, यांनी प्रयत्न केले.