मेढा (प्रतिनिधी) दिनांक- २९.- कराड तालुक्यातील वाठार येथील युवक संकेत काळे हा आपल्या सहकारी मित्रांसमवेत पर्यटनासाठी आला होता. दोन दिवसांपूर्वी तो पोहताना बुडाला असे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्यांनतर सदरच्या युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम सूरू आहे,संकेत च्या पश्चात आई वडील, पत्नी, दिड वर्षाची लहान मुलगी असा परिवार आहे. संकेत चा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यातील म्हावशी गावच्या हद्दीत मंगळवार ता.27 रोजी सायंकाळी शिवसागर जलाशयात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात अपयश आले असून, घाटना घडल्या नंतर तिसऱा दिवस उजाडला तरी शोधमोहीम राबवूनही अद्यापही मृतदेह हाती लागला न्हवता. सदरच्या घटनास्थळी नातेवाईकांनी तळ ठोकला असून कुटुंबियांच्या आक्रोशाने उपस्थितांचे मने हेलावत आहेत. जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलिस निरीक्षक अमोल माने, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव बामणोली यांनी घाटनास्थळी जाऊन शोध मोहीमेचा आढावा घेतला. तसेच शोध मोहिम अधिक गतिमान करण्याच्या दृष्ठीने आदेशही दिले आहेत. आज वन विभागाच्या बोटीने सायंकाळी सात वाजेपर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र अद्यापही मृतदेह हाती लागला नाही. अखेर उद्या सकाळी NDRF ची टीम शोध घेण्यासाठी येणार असल्याचे सांगीतले जात आहे
“माझा नवरा मला शोधून द्या” -पत्नीचा आक्रोश
“माझा नवरा मला शोधून द्या” शिवसागर जलाशयात बुडालेल्या युवकाच्या पत्नीने पोलिसांसमोर आक्रोश करत टाहो फोडला, घटनास्थळी पोहचलेल्या संकेत काळेच्या पत्नी, वडील व नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. आपल्या पतीचा शोध घ्यावा यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसमोर पत्नीने हंबरडा फोडला.संकेतचा मृत्यू कसा झाला ह्या बाबत उलटसुलट चर्चा असून संबंधित घटनेची योग्य ती चौकशी होऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा.अशी मागणीही यावेळी कुटुंबियांकडून करण्यात आली