महेश बारटक्के –
कुडाळ ता.27 – समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात! मनातील उभ्या असणाऱ्या वादळरूपी ध्येयास जिद्दीच्या जोरावर पैलतिरी पोहोचवण्यासाठी एक ध्येयवेड्या माणसाचा असामान्य प्रवास आपण या बातमीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत. जीवन जगत असताना जन्माला आलेला प्रत्येक जणच आपापल्या पद्धतीने जीवनाची पाने पलटत जात असतो मात्र फार कमी लोक असतात त्या पलटलेल्या पानांनाही सोनेरी मुलामा देत प्रत्येकाच्या मनावर त्या पलटलेल्या पानाची आदर्शवत सावली ठेवून पुढे पाऊले टाकत पाठीमागे उमटलेल्या पावलांच्या परिस्पर्शाने प्रत्येकामध्ये नवीन ऊर्जेचा स्रोत निर्माण करत असतात. अशाच अद्भुत रसायनाची म्हणजेच कुडाळचे उदयोजक संदिप हिंदुराव शिंदे यांच्या संघर्षमय व प्रेरणा बनवत केलेल्या प्रवासाची कहाणी थेट आपल्यापर्यंत. जावली तालुक्यातील कुडाळ येथील उद्योजक संदीप हिंदुराव शिंदे यांनी समाजासाठी घातक असलेले प्लास्टिकबाबत समाजात जनजागृती होण्यासाठी सायकल रॅलीची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ते पुणे ते तंजावर असा कुटुंबासह अंदाजे 1250 किमी चा सायकल प्रवास करणार आहेत.या सायकल रॅलीमध्ये त्यांच्या पत्नी सैा. साक्षी संदीप शिंदे, त्यांची मुले राजवीर वय 9 व शिवराज वय 13 सहभागी झाली आहेत.
या सायकल रॅली मागील त्यांचा मुख्य हेतू असा आहे की, आज सर्व स्तरावर प्लास्टिक मोठ्या प्रमाणात विकले व वापरले जात असून प्लास्टिकमुळे जमीन व समुद्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. या मोहिमेला पुण्यातून सुरुवात झाली.या प्रवासादरम्यान पाचवड ता.वाई येथील तिरंगा हायस्कूलमध्ये त्यांनी प्लास्टिक वापराचे तोटे सांगून जनजागृती केली. मुलांनीही प्लास्टिकचा वापर आम्ही टाळू असे आश्वासन संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहे. हायस्कूलच्यावतीने संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुडाळ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ व तिरंगा स्कूलचे मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.