कुडाळ ( प्रतिनिधी)
कुडाळ ता.16 – राज्य मानवी आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ ता. जावळी येथील बाजारपेठेत झालेली अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आज शुक्रवार ता.16 रोजी काढण्यात आली. यावेळी अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र तहसीलदार व बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी समजून सांगितल्या नंतर काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतः होऊन अतिक्रमण काढून घेतली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र येथील एस. टी. स्टॅन्ड लगतचे काही व्यापारी यांनी न्यायालयात धाव घेतल्याने गाळे काढण्यासाठी न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे संकट पुढील सुनावणी पर्यंत टळाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार बाजार पेठेतील अतिक्रमणा बाबत संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या.एका रहिवाशाच्या घरात जाण्यायेण्याचा रस्ता अतिक्रमाणामुळे बंद झाला होता. त्यामुळे संबंधिताने याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानुसार संबंधित विभागाला चौकशी करून सदरची अतिक्रमणे हटवून रस्ता खुला करण्याचे निर्देश मानवी हक्क आयोगाने दिले होते.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून अतिक्रमित बांधकाम धारकांना एक महिन्या पूर्वीच नोटीस बजावल्या होत्या. या मध्ये बस स्टॅन्ड नजीक नव्यानेच बांधन्यात आलेल्या फळे भाजीपाला कट्ट्याचाही समावेश होता. सदर व्यापाऱ्यांची उपजीविका या व्यवसायांवर असल्याने अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात गाळे धारकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान अन्य अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आपल्या टीमसह सकाळी नऊ वाजता कुडाळ मध्ये दाखल झाले. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या कारवाईला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.